(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरीच्या क्रीडाक्षेत्रासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. नेपाळ येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल ज्युनिअर टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या विजयी मोहिमेत रत्नागिरीची खेळाडू गौरिज मिलिंद माळी याने उल्लेखनीय योगदान देत कोकणासह महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले.
भारतीय संघाच्या या शानदार यशामुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण असून, गौरिज माळी व संपूर्ण भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गौरिजच्या यशामुळे रत्नागिरीतील क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावामुळे अनेक होतकरू खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.
ही कामगिरी केवळ गौरिज माळीची किंवा भारतीय संघाची नसून, रत्नागिरीच्या समृद्ध क्रीडा परंपरेचा आणि भारतीय युवा खेळाडूंच्या जिद्दीचा गौरव असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
भारतीय संघाने मिळवलेल्या या ऐतिहासिक यशामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी अनेक यशस्वी कामगिरी करण्याचा आत्मविश्वास संघाला मिळाला आहे.

