(मुंबई)
भारतीय क्रीडाप्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन भारतात होणार असल्याचं निश्चित झालं आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी अहमदाबाद शहराची निवड करण्यात आली असून राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारिणीने या निर्णयाला प्राथमिक मंजुरी दिली आहे. त्यामुळे तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा एकदा भारतात राष्ट्रकुल स्पर्धेचं आयोजन होणार आहे. यापूर्वी २०१० साली नवी दिल्लीत या स्पर्धा झाल्या होत्या. अहमदाबाद आणि नायजेरियातील अबुजा यांच्यात यजमानपदासाठी चुरस होती, मात्र अबुजाने आपले धोरण तयार करण्याचा निर्णय पुढे ढकलल्याने अहमदाबादचे नाव पुढे आले आहे.
राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या निवेदनानुसार, २०३० च्या शताब्दी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबाद येथे प्रस्तावित करण्यात आली असून या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब २६ नोव्हेंबरला ग्लासगो येथे होणाऱ्या महासंघाच्या अधिवेशनात केले जाणार आहे. या निर्णयामुळे भारताच्या २०३६ च्या ऑलिम्पिक यजमानपद मोहिमेलाही मोठी चालना मिळणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव कल्याण चौबे यांनी सांगितले की, अहमदाबादमध्ये होणाऱ्या स्पर्धेत सर्व खेळांचा समावेश असेल. पुढील वर्षी ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा खर्च कमी करण्यासाठी मर्यादित स्वरूपात घेतल्या जात आहेत, त्यामुळे त्या फक्त १२ किमी क्षेत्रफळात होतील आणि त्यांचे अंदाजपत्रक सुमारे १ कोटी १४ लाख पौंड (सुमारे १,३०० कोटी रुपये) आहे. मात्र अहमदाबादमधील स्पर्धा सर्वसमावेशक आणि भव्य स्वरूपात होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एनक्लेव्ह या अत्याधुनिक क्रीडा संकुलात बहुतेक स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. या एनक्लेव्हच्या उभारणीचं काम सध्या सुरू असून नरेंद्र मोदी स्टेडियम परिसरात जलतरण आणि फुटबॉल स्टेडियम, तसेच टेबल टेनिस, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, कुस्ती, कबड्डी आणि खो-खो यांसाठी दोन आधुनिक इनडोअर स्पोर्ट्स अरेना तयार करण्यात येत आहेत. गुजरातमध्ये काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन झालं होतं आणि नुकत्याच अहमदाबादमध्ये आशियाई जलतरण स्पर्धाही पार पडल्या आहेत. त्यामुळे या शहराची निवड अत्यंत योग्य मानली जात आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळाल्यास भारतीय खेळाडूंच्या पदक संख्येत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. कारण या स्पर्धेत कबड्डी, खो-खो, कुस्ती, नेमबाजी आणि हॉकीसारखे भारताची ताकद असलेले खेळ समाविष्ट करण्यात येणार आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव कल्याण चौबे यांनी संघटनेच्या वार्षिक सभेत या खेळांच्या समावेशाबाबत माहिती दिली होती.
या निर्णयामुळे केवळ क्रीडा क्षेत्रालाच नव्हे तर भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेलाही मोठा फायदा होणार आहे. अहमदाबादसारखं आधुनिक पायाभूत सुविधा असलेलं शहर अशा दर्जेदार स्पर्धांसाठी सज्ज होत आहे. यामुळे देशभरातील तरुण खेळाडूंना जागतिक स्तरावर आपली क्षमता दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

