(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील खरवते गावातील मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटची समस्या दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे. गावात नवीन जिओ टॉवर उभारण्यासाठी शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर जिओ प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. खरवते गावात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्यात येईल आणि लवकरच नवीन जिओ टॉवर उभारण्यात येईल, असे आश्वासन जिओच्या रत्नागिरी कार्यालयाच्या जनरल मॅनेजर यांनी दिल्याची माहिती संबंधितांनी दिली.
डिजिटल युगातही खरवते गावातील अनेक वाड्यांमध्ये मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः शालेय विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांना इंटरनेट व मोबाईल सेवांचा लाभ घेण्यात अडथळे येत होते. या समस्येमुळे होणारे शैक्षणिक आणि व्यावसायिक नुकसान लक्षात घेऊन युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खरवते येथील युवासैनिक करण निवेंडकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
या पाठपुराव्यासाठी माजी युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. तसेच युवासेना तालुकाप्रमुख संदेश नारगुडे यांच्या पाठबळामुळे करण निवेंडकर यांनी शिवसेना नेते, सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडे खरवते गावातील नेटवर्क समस्येचा प्रश्न मांडला.
ग्रामस्थांची ही अडचण दूर करण्यासाठी विनायक राऊत यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जिओ, रत्नागिरी येथील जनरल मॅनेजर यांना अधिकृत पत्र पाठवून खरवते येथे नवीन जिओ टॉवरला तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली. त्यानंतर विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना तालुकाप्रमुख संदेश नारगुडे आणि युवासैनिक करण निवेंडकर यांनी जिओच्या रत्नागिरी कार्यालयात जाऊन जनरल मॅनेजर यांना निवेदनाची प्रत प्रत्यक्ष सुपूर्द केली.
या निवेदनाची जिओ प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, गावात प्रत्यक्ष पाहणी करून लवकरच टॉवर उभारण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून नेटवर्कच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या खरवते ग्रामस्थांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रश्नाच्या पाठपुराव्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल ग्रामस्थांनी शिवसेना नेते विनायक राऊत, माजी युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, युवासेना तालुकाप्रमुख संदेश नारगुडे आणि युवासैनिक करण निवेंडकर यांचे आभार मानले आहेत. मात्र, प्रत्यक्ष टॉवर उभारणी आणि नेटवर्क सेवा सुरू झाल्यानंतरच गावातील समस्या पूर्णपणे सुटणार आहे.


