(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने व्यापक पातळीवर ‘झिरो एक्सडेंट ड्राईव्ह’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्राणघातक अपघातांचे प्रमाण किमान १० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली १ जूनपासून ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी, व्यापक जनजागृती आणि विविध यंत्रणांशी समन्वय साधून अपघात प्रतिबंधासाठी बहुआयामी उपाययोजना करण्यात येत आहेत. अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्याने या मोहिमेची तीव्रता अधोरेखित झाली आहे. १ जून ते ८ जून या कालावधीत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या तब्बल ४०१ वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या १७३ चालकांवर कारवाई करण्यात आली असून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या १६२ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधातही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
केवळ दंडात्मक कारवाईवर भर न देता नागरिकांमध्ये वाहतूक शिस्तीची जाणीव निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व १८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे तसेच विविध संस्थांमध्ये मार्गदर्शन सत्रे, संवाद कार्यक्रम आणि रस्ते सुरक्षा अभियानांचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांची ओळख करून त्याठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांनाही गती देण्यात आली आहे. हातखंबा आणि भोस्ते घाट या संवेदनशील ठिकाणी विशेष वाहतूक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. तसेच संभाव्य अपघात क्षेत्रांमध्ये सूचना फलक, वेगमर्यादा दर्शविणारे फलक आणि दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत. वाहनांचा वेग नियंत्रणात राहावा यासाठी महामार्गावरील निवडक ठिकाणी रंबल स्ट्रिप्सही बसविण्यात आल्या आहेत.
रस्ते सुरक्षा ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत जिल्हा पोलीस दलाने वाहनचालकांना मद्यपान करून वाहन चालविणे टाळण्याचे, वेगमर्यादांचे काटेकोर पालन करण्याचे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट तर चारचाकी चालकांनी सीट बेल्टचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

