(खेड / वार्ताहर)
चिंचघर-दस्तुरी केंद्राची जुलै महिन्यातील केंद्रस्तरीय शिक्षण परिषद शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, चिंचघर प्रभूवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. शाळेचे मुख्याध्यापक नरेश ठोंबरे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर केंद्रप्रमुख प्रभाकर कोळेकर यांनी प्रास्ताविकातून परिषदेचे उद्दिष्ट स्पष्ट केले.
परिषदेत अॅड. दिलीप चव्हाण यांनी मिशन अभय अंतर्गत विद्यार्थी सुरक्षा, महिला सुरक्षा आणि पॉक्सो (POCSO) कायद्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाला उपस्थित शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर क्षितिजा तावरे यांनी आनापान व विपश्यना, अर्चना शिरसाट यांनी शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन, मनीषा खिळे यांनी अध्ययन निष्पत्तीवर आधारित अध्यापन, सविता सुतार यांनी समाज सहभाग, तर अनिल पार्टे यांनी करिअर मार्गदर्शन या विषयांवर मार्गदर्शन केले.
मध्यंतरानंतर केंद्रप्रमुख प्रभाकर कोळेकर यांनी निपुण अभियानांतर्गत सर्व शाळांचा विषयनिहाय आढावा घेत विविध प्रशासकीय बाबींवर मार्गदर्शन केले. तसेच केंद्र संसाधन समूह (CRG) विषयी माहिती देऊन नवीन केंद्र संसाधन समूहाची स्थापना करण्यात आली.
या परिषदेला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उदय गुहागरकर, उपाध्यक्षा प्रिया गुहागरकर, स्थानिक प्राधिकरण सदस्य सखाराम जाधव, माजी सरपंच सांगली मॅडम, निवृत्त केंद्रप्रमुख अशोक साळुंखे, शिक्षणप्रेमी सांगले सर, समिती सदस्य, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक नरेश ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर शिक्षक विनोद जाधव, उपशिक्षक सतीश गजमल आणि सूर्यकांत बेंद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक नरेश ठोंबरे यांनी केले.

