(रत्नागिरी)
महाराष्ट्र बारव मोहिमेअंतर्गत अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या एनएसएस स्वयंसेवकांनी श्री देव भैरी देवस्थानच्या परिसरातील तळ्याची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकीची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित केली. या उपक्रमात श्रीरंग मसुरकर आणि कार्यक्रमाधिकारी अभिजित भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
तळ्यात साचलेला कचरा, प्लास्टिक पिशव्या, गाळ आणि इतर घाण काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. देवस्थान परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. “स्वच्छता हीच सेवा” या संदेशाचा प्रसार करत स्वयंसेवकांनी ग्रामस्थांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले.
या स्वच्छतेमुळे तळ्याचे सौंदर्य पुन्हा एकदा खुलले. यातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश समाजापर्यंत पोहोचला. बारव मोहिमेतील कार्यकर्ते श्रीरंग मसुरकर यांनी स्वयंसेवकांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. महाराष्ट्र बारव मोहिमेअंतर्गत राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन आणि कार्यवाह सतीश शेवडे यांनी स्वयंसेवकांचे कौतुक केले.

