(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठी पावले उचलली आहेत. काही प्रमुख मागण्यांबाबत केंद्राने लेखी आश्वासन दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी गुरुवारी रात्री गुरुग्राममधील मेदान्ता रुग्णालयात आपले तब्बल 26 दिवसांचे उपोषण मागे घेतले होते. या आश्वासनांमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा विचार तसेच आत्महत्या केलेल्या NEET परीक्षार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचा समावेश आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे पेपरफुटीच्या घटनांना “घोर अन्याय” संबोधत दोषींविरुद्ध आणखी कठोर कारवाईचे आश्वासन दिले. त्यांनी आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती देत भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर यंत्रणा उभारली जाईल, असे स्पष्ट केले.
NTA वर मोठी कारवाई; 47 अधिकाऱ्यांची हकालपट्टी
NEET पेपरफुटीनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) च्या कामकाजावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना केंद्र सरकारने संस्थेत मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. NTA मधील तब्बल 47 अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली असून काही अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी आणि कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे. ही कारवाई NTA च्या व्यापक पुनर्रचनेचा भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.
‘लीक-प्रूफ’ परीक्षा प्रणाली विकसित करण्याचा निर्णय
सरकारने NTA च्या परीक्षा प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या आउटसोर्सिंग मॉडेलचाही आढावा सुरू केला आहे. परीक्षांचे आयोजन आणि तांत्रिक व्यवस्थापन अधिक सुरक्षित करण्यासाठी तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार नवीन प्रणाली लागू केली जाणार आहे. उद्दिष्ट एकच, पेपरफुटीला पूर्णपणे आळा घालणारी ‘लीक-प्रूफ’ परीक्षा व्यवस्था उभारणे. याचबरोबर पेपरफुटीच्या प्रकरणांची जलद सुनावणी व्हावी म्हणून फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली असून दिल्ली उच्च न्यायालयाने अशा प्रकरणांसाठी विशेष न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे.
शिक्षण मंत्रालयातही मोठा प्रशासकीय बदल
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयातही मोठा बदल केला आहे. उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांची बदली करून त्यांच्या जागी नरेश पाल गंगवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना गुरुवारी उशिरा रात्री जारी करण्यात आली.
NTA मध्ये सध्या किती कर्मचारी आहेत?
सध्या NTA मध्ये 22 कर्मचारी प्रतिनियुक्तीवर, 38 करारावर, 138 आउटसोर्स कर्मचारी तसेच एक कर्मचारी मूळ विभागातून समाविष्ट करण्यात आला आहे. याशिवाय 29 ऑक्टोबर 2024 रोजी सरकारने 16 नवीन पदांना मंजुरी दिली होती. त्यामध्ये 8 संचालक आणि 8 संयुक्त संचालक पदांचा समावेश आहे. NTA दरवर्षी NEET, JEE, CUET यांसह 15 ते 20 राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आयोजित करते. त्यामुळे संस्थेतील सुधारणांकडे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचे राज्यसभा सदस्य जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मध्यरात्रीच्या व्हिडिओवर उपरोधिक टीका केली. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, कोलकात्यात NEET पेपरफुटीविरोधातील मोर्चादरम्यान धर्मतळा परिसरात आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला. आंदोलकांनी पोलिसांवर पाण्याच्या बाटल्या आणि बूट फेकल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला.

