(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला केंद्र शासनाने विशेष सुविधा तसेच वाचनालयाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार नारायण राणे यांच्याकडे करण्यात आली.
नव्या वास्तूत वाचनालयाचे कार्य प्रारंभ झाल्यानंतर पहिल्यांदाच खासदार नारायण राणे यांनी वाचनालयाला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी वाचनालयाचे सचिव दीपक पटवर्धन यांनी शाल, श्रीफळ, पुष्पकरंडक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकाचे स्मरणिकेचे स्वरूपात देऊन राणे यांचे स्वागत केले.
राणे यांनी वाचनालयाची सविस्तर पाहणी करून सुबक वास्तू उभारल्याबद्दल आणि वाचनसंस्कृती टिकवून ठेवल्याबद्दल दीपक पटवर्धन यांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “रत्नागिरीचे हे वाचनालय समृद्ध परंपरा आहे. येथे विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध असून, प्रशस्त व सुबक इमारतीमुळे वाचकांनी या वाचनालयाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”
या प्रसंगी दीपक पटवर्धन यांनी खासदार राणे यांना निवेदन सादर केले. या निवेदनात २०० वर्षांच्या उंबरठ्यावर असलेल्या वाचनालयातील ग्रंथसंपदेचे डिजिटायझेशन करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. तसेच हे वाचनालय डिजिटल ऑनलाईन माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा आणि सेटअप उभारण्यासाठी सुमारे ३ कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाने किंवा कॉर्पोरेट सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती करण्यात आली.
यासोबतच वाचनालयाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक योगदानाचा विचार करून केंद्र शासनाने वाचनालयाला विशेष सुविधा आणि स्वतंत्र दर्जा द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.
या प्रसंगी सचिन करमरकर, मुन्ना चवंडे, उमेश कुलकर्णी, प्रवीण देसाई, सौ. शिल्पा मराठे, सौ. मुग्धा पुरोहित तसेच वाचनालय कर्मचारी उपस्थित होते.

