(मुंबई/ वृत्तसंस्था)
मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड–सावंतवाडी रोड–नांदेड दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी नांदेड–पुणे–कल्याण–रत्नागिरी–सावंतवाडी रोड मार्गावर धावणार आहे.
नांदेडहून सावंतवाडी रोडकडे जाणारी विशेष गाडी क्रमांक 07659 ही 12 आणि 15 सप्टेंबर 2026 रोजी धावेल. नांदेड येथून रात्री 8 वाजता ही गाडी सुटणार असून, प्रवासाच्या तिसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 07660 सावंतवाडी रोड–नांदेड विशेष 14 आणि 17 सप्टेंबर 2026 रोजी धावणार आहे. सावंतवाडी रोड येथून सकाळी 7.30 वाजता सुटणारी ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 11.30 वाजता नांदेड येथे पोहोचेल.
या विशेष रेल्वेला नांदेड, पूर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, येडशी, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड हे प्रमुख थांबे असतील.
या गाडीला एकूण २४ डबे असतील. त्यामध्ये २-टियर वातानुकूलित (2AC) चे ३ डबे, ३-टियर वातानुकूलित (3AC) चे ५ डबे, शयनयान श्रेणीचे १० डबे, सामान्य द्वितीय श्रेणीचे ४ डबे, तसेच २ एसएलआर/लगेज व्हॅनचा समावेश आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मराठवाड्यातून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष रेल्वे सेवा महत्त्वाची ठरणार आहे. या विशेष गाडीसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष भाडे दर आकारले जाणार आहेत.


