(मुंबई)
खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून सोलापूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थेट आपल्या किडन्याच विकल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत समोर आली. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरातून आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय मानवी अवयव तस्करीचे जाळे उघड झाले आहे.
कम्बोडियात किडनी विकून कर्जफेड
मुख्यमंत्र्यांच्या लेखी उत्तरानुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने खासगी सावकारांच्या तगाद्यामुळे कम्बोडिया येथे जाऊन ८ लाख रुपयांना किडनी विकली आणि कर्ज फेडले. पोलिस तपासात या प्रकरणामागे मध्यस्थ सक्रिय असल्याचे समोर आले असून, त्या मध्यस्थाने स्वत:सह आणखी ९ व्यक्तींच्या किडन्या कम्बोडिया आणि तिरूचिरापल्ली येथील स्टार किम्स हॉस्पिटल येथे विकल्याची माहिती उघड झाली आहे. हे किडनी रॅकेट तामीळनाडू येथील तिरुचिरापल्ली (तिरुची) येथील एका हॉस्पिटलद्वारे चालवले जात असल्याबद्दल नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
६ सावकारांसह ५ जण आरोपी; ८ अटकेत
या प्रकरणात सावकारी करणारे ६ आरोपी आणि किडनी खरेदी-विक्रीत सहभागी आणखी ५ जण आरोपी ठरवण्यात आले आहेत. यापैकी ८ जणांना अटक झाली असून एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
विधानसभेत प्रश्न, लेखी उत्तरातून उलगडा
काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नितीन राऊत, भाजपचे अतुल भातखळकर यांच्यासह अन्य सदस्यांनी राज्यात सावकारी कर्जाच्या परतफेडीसाठी शेतकऱ्यांना किडनी विकावी लागत असल्याचा आणि तामिळनाडूतील रुग्णालयाद्वारे रॅकेट चालवल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला होता. प्रश्न चर्चेला आला नसला, तरी मुख्यमंत्र्यांच्या लेखी उत्तरातून सर्व तपशील समोर आले.
तक्रारदार शेतकऱ्याने सावकारांकडून ९.१५ लाखांचे कर्ज घेतले होते. व्याजासह परतफेड करताना त्याने ४८.५३ लाख रुपये आणि एक एकर जमीन दिली, तरीही तगादा थांबला नाही. अखेर कर्जातून सुटका करण्यासाठी शेतकऱ्याने कम्बोडियात जाऊन ८ लाखांना किडनी विकून ६ लाखांचे कर्ज फेडले. तपासात सोलापूर येथील मध्यस्थामार्फत हे व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पीडितांपैकी ७ जण परराज्यातील असल्याची माहितीही पुढे आली.
या प्रकरणाने सावकारी, मानवी अवयव तस्करी आणि शेतकऱ्यांच्या असहायतेचा भयावह चेहरा समोर आणला आहे. सरकारने कठोर कारवाई आणि रॅकेटची मुळे उखडण्याचा निर्धार व्यक्त केला असून तपास वेगाने सुरू आहे.

