(शिर्डी /अहिल्यानगर)
राहाता-शिर्डी दरम्यान नगर-मनमाड रस्त्यावर श्रीखंडे वस्तीजवळील ओढ्यातील पाणी अचानक रस्त्यावरून वाहू लागल्याने भीषण अपघात घडला. मोटारसायकलवरून जाणारे चार तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले, मात्र कोपरगाव येथील एसबीआयचे कर्मचारी प्रसाद पोपटराव विसपुते आणि डी-मार्टचे कर्मचारी रोहित दगू खरात यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतूक तातडीने बंद केली. पोलिस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली व निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली बचावकार्य करण्यात आले.
अतिवृष्टीत अनेक कुटुंबे बेघर झाल्याच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर शिर्डीतील पीडित नागरिकांसाठी निवारा केंद्रे व अन्नछत्र उभारण्यात आले असून, साई आश्रम येथे तात्पुरती निवासव्यवस्था आणि प्रसादालयात भोजनाची सोय करण्यात आली आहे. शिर्डी साईबाबा संस्थानसोबतच, शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानने देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 1 कोटी 11 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या मदतीमुळे राज्य सरकारला पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यास बळ मिळणार आहे.
मुसळधार पावसामुळे शिर्डी शहरातील कालिकानगर व पश्चिम भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले, झाडे उन्मळून पडली व वीजपुरवठा विस्कळीत झाला. नगर-मनमाड महामार्गावर पाणी व खड्ड्यांमुळे दृष्यमानता कमी झाली आणि सलग पाच वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले.
परिस्थिती हाताळण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, प्रांताधिकारी माणिक आहेर आणि तहसीलदार अमोल मोरे यांनी घटनास्थळी जाऊन मदत व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला.
पावसाची नोंद
राहाता (१६७.३ मिमी), शिर्डी (१४७.८ मिमी), लोणी (१६६.५ मिमी), बाभळेश्वर (१२९ मिमी), पुणतांबा (१२६.८ मिमी) आणि अस्तगाव (१६७.८ मिमी) असा तालुक्यात सरासरी १५०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील २-३ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पावसाचा तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

