(मुंबई)
राज्यातील कृषी पदविका अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याची महत्त्वपूर्ण माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. कृषी शिक्षण अधिक रोजगाराभिमुख, कौशल्याधारित आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देणारे करण्यासाठी शासन आवश्यक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे प्रतिनिधी तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कृषी पदविका अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा दिल्यास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, व्यावसायिक आणि रोजगाराच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नवीन संधी उपलब्ध होतील, यावर बैठकीत सकारात्मक विचारमंथन झाले.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, आधुनिक काळात कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता वापर, बदलती आव्हाने आणि कुशल मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेता कृषी पदविका अभ्यासक्रम अधिक सक्षम आणि आधुनिक करणे आवश्यक बनले आहे. व्यावसायिक दर्जा मिळाल्यास विद्यार्थ्यांना सरकारी आणि खासगी क्षेत्रातील नोकऱ्या, कृषी उद्योग, अॅग्री-बिझनेस तसेच स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील.
बैठकीत कृषी पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशक्षमता वाढविणे, अभ्यासक्रम अधिक आधुनिक करणे, कौशल्याधारित प्रशिक्षणाला प्राधान्य देणे आणि विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी थेट जोडणाऱ्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली. यासंदर्भात सविस्तर अहवाल तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
राज्यातील कृषी शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही भरणे यांनी सांगितले. कृषी क्षेत्रासाठी तंत्रज्ञानस्नेही आणि कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
“राज्यातील कृषी पदविका विद्यार्थ्यांना अधिक व्यापक व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या कौशल्यांना अधिकृत मान्यता मिळवून देणे आणि कृषी शिक्षणाचा दर्जा उंचावणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आधुनिक कृषी क्षेत्रासाठी सक्षम, तंत्रज्ञानस्नेही आणि रोजगारक्षम युवा पिढी घडविण्यासाठी आवश्यक सर्व धोरणात्मक निर्णय शासन घेईल,” असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.

