(बारामती)
बारामती परिसरात घडलेल्या विमान अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीने थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना सांगितली. विमान लँडिंगसाठी खाली येत असतानाच काहीतरी अघटित घडणार असल्याची जाणीव झाली आणि काही क्षणांतच विमान कोसळले, असे त्यांनी सांगितले.
(अजित दादांचा आज सकाळी विमानातून बारामती येथे जाण्यासाठी निघतानाचा व्हिडिओ)
प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, “मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिलं. विमान खाली उतरत होतं तेव्हाच ते कोसळेल असं वाटलं आणि ते खरंच कोसळलं. त्यानंतर मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर आम्ही सगळे धावत घटनास्थळी आलो. विमानाला भीषण आग लागली होती. काही क्षणांतच ४ ते ५ स्फोट पुन्हा झाले.”
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अनेकांनी विमानातील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता इतकी जास्त होती की कुणालाही जवळ जाता आले नाही. “आग खूप मोठी होती. लोक मदत करू इच्छित होते, पण परिस्थिती हाताबाहेर होती,” असेही प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
विमानात अजित पवार उपस्थित असल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात शोक आणि चिंता पसरली. “ही आमच्यासाठी अत्यंत दुःखद गोष्ट आहे. जे घडलं ते शब्दांत सांगणं कठीण आहे,” असे भावुक शब्दांत प्रत्यक्षदर्शीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
अपघात इतका भीषण होता की विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. परिसरात आगीचे लोट आणि दाट धूर पसरला होता. या घटनेने संपूर्ण राज्यासह देशात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज्याच्या राजकारणातील प्रभावशाली नेतृत्व हरपले
२२ जुलै १९५९ रोजी जन्मलेले अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत प्रभावशाली नेते होते. १९८२ साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि अल्पावधीतच स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. काका शरद पवार यांच्यासोबत काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रशासनावरची मजबूत पकड, निर्णयक्षमता आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांची ओळख होती.
सात वेळा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी
अजित पवार यांनी तब्बल सात वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले. पहाटेपासून कामाला लागणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. राज्याच्या आर्थिक नियोजनात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. १९९३ साली शरद पवार मुख्यमंत्री असताना अजित पवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. २०१० मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांचा राजकीय प्रभाव आणखी वाढला.
सहकार क्षेत्रातील भक्कम आधार
राजकारणासोबतच सहकार क्षेत्रातही अजित पवार यांचा मोठा प्रभाव होता. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने, तसेच पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जुलै २०२३ पासून त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती आणि राज्याच्या राजकारणात निर्णायक भूमिका निभावत होते.
तळागाळातील लोकनेता हरपला – पंतप्रधान मोदी
अजित पवार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “श्री अजित पवार जी हे तळागाळातील लोकांशी खोलवर जोडलेले एक जननेते होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात अग्रणी भूमिका बजावणारे कष्टाळू व्यक्ती म्हणून त्यांचा सर्वत्र आदर असे. प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज, गरीब आणि वंचितांना सक्षम बनवण्याची त्यांची इच्छाशक्ती देखील प्रशंसनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप दुःखद आणि धक्कादायक आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना आमच्या संवेदना. ओम शांती.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुःखद प्रतिक्रिया
अजितदादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्याची अचूक माहिती, जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण आणि जनसामान्यांमध्ये प्रचंड विश्वास असलेले असे नेतृत्व आज महाराष्ट्राने गमावले आहे. अजित पवार हे अत्यंत संघर्षशील आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी न डगमगता पुढे जाणारे नेतृत्व होते. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. अशा नेतृत्वाची उभारणी होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. विकासाच्या निर्णायक टप्प्यावर असताना त्यांचे अचानक जाणे हे अविश्वसनीय आणि मनाला चटका लावणारे आहे.
माझ्यासाठी हा केवळ राजकीय सहकारी नाही, तर एक वैयक्तिकरित्या दमदार आणि दिलदार मित्र गमावल्याचा क्षण आहे. त्यांच्या कुटुंबासाठी तर हा अतिशय मोठा आघात आहे. मी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच बारामतीकडे रवाना होत आहोत.
पुढील सर्व निर्णय कुटुंबीयांशी चर्चा करून आणि त्यांच्या संमतीने घेतले जातील. संपूर्ण कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर पुढील कार्यपद्धती ठरवली जाईल. या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली असून तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. पुढील बाबींची सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल.
एकनाथ शिंदेंची भावुक प्रतिक्रिया
“अजितदादांच्या निधनाची घटना मनाला चटका लावणारी आहे. इतक्या लवकर ते आपल्यातून जातील, हे कोणाच्या स्वप्नात नव्हते. महाराष्ट्राने एक अत्यंत अनुभवी, अभ्यासू आणि वेळेचे महत्त्व जाणणारा नेता गमावला आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. “आम्ही टीम म्हणून काम करत होतो. त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबाचे नाही, तर संपूर्ण राज्याचे न भरून येणारे नुकसान झाले आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया एका शब्दात
सुप्रिया सुळे यांनी एका शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या – “डिवास्टेटेड.” ‘डिवास्टेटेड’ अर्थात उद्ध्वस्त अशा एका शब्दात सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राजकीय मतभेद असूनही अलीकडे पवार कुटुंबात पुन्हा एकत्र येण्याचे चित्र दिसत होते. या पार्श्वभूमीवर ही घटना अधिक वेदनादायक ठरली आहे.
‘ब्लॅक बॉक्स’ उलगडणार अपघाताचं रहस्य
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आता तपासाची औपचारिक आणि तांत्रिक प्रक्रिया सुरू होणार आहे. या तपासातून अपघात नेमका कशामुळे झाला, मानवी चूक होती की तांत्रिक बिघाड, याचा निष्कर्ष काढला जाणार आहे. नागरी विमान वाहतूक नियमांनुसार ही चौकशी बहुस्तरीय आणि सखोल स्वरूपाची असते.
सर्वप्रथम अपघातस्थळी सापडलेल्या विमानाच्या ढिगाऱ्यांचे स्थान आणि स्थिती काळजीपूर्वक नोंदवली जाईल. विमान कोणत्या वेगाने आणि कोणत्या कोनात जमिनीवर आदळले, हे समजून घेण्यासाठी उच्च दर्जाची छायाचित्रे आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात येतील. यावरून अपघाताच्या शेवटच्या क्षणांतील हालचालींचा अंदाज घेतला जातो.
त्यानंतर तपासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ब्लॅक बॉक्सची तपासणी. फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरच्या माध्यमातून उड्डाणावेळी विमानाची तांत्रिक स्थिती, इंजिनची कामगिरी, वेग, उंची तसेच वैमानिकांनी घेतलेले निर्णय स्पष्ट होतील. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगमधून अपघाताच्या आधी वैमानिकांमध्ये झालेल्या संभाषणाची माहितीही समोर येणार आहे.
उड्डाणपूर्व देखभाल आणि तांत्रिक तपासणीशी संबंधित सर्व नोंदी तपासल्या जातील. विमान उड्डाणासाठी पूर्णपणे सुरक्षित होते का, देखभालीदरम्यान काही त्रुटी राहिल्या होत्या का, यावर विशेष लक्ष दिले जाईल. यासोबतच वैमानिक आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष (ATC) यांच्यातील संभाषणाचे अधिकृत रेकॉर्डही तपासण्यात येणार आहेत.
तपासात केवळ विमान आणि मानवी घटकच नव्हे, तर बाह्य परिस्थितीचाही विचार केला जाईल. त्या वेळी हवामान कसे होते, धावपट्टीची स्थिती, वाऱ्याची दिशा आणि वेग यांचा अपघातावर काही परिणाम झाला का, याचे विश्लेषण केले जाईल. या सर्व टप्प्यांनंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या शिफारशी संबंधित यंत्रणांना केल्या जातील.

