(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुका आणि परिसरात सध्या वन्य हिंस्त्र प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एरवी दाट जंगलात राहणारे बिबटे आणि गवे आता थेट मानवी वस्तीत, शेती परिसरात तसेच मुख्य रस्त्यांवर मुक्तपणे वावरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, केवळ रात्रीच नव्हे तर भर दिवसा हे वन्य प्राणी रस्त्यांवर आणि वस्तीच्या अगदी जवळ दिसत असल्याने शेतकरी, वाहनचालक आणि प्रवाशांची चिंता वाढली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, समोर वाहन किंवा माणसे दिसूनही हे प्राणी अजिबात घाबरत नाहीत. अनेकदा बिबटे आणि गव्यांचे कळप रस्त्यांवर ठाण मांडून उभे राहत असल्याने वाहनचालकांची अक्षरशः गाळण उडत आहे. त्यामुळे रात्रीसोबतच दिवसाही प्रवास करणे धोकादायक बनले आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी पहाटेपासून शेतात कामासाठी जात आहेत. मात्र वाढत्या वन्य प्राण्यांच्या वावरामुळे शेतात जाण्याचीही भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही बिबटे आणि काळ्या रंगाच्या भल्यामोठ्या गव्यांचे वारंवार दर्शन होत आहे. त्यामुळे मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष अधिक गंभीर होत चालल्याचे चित्र आहे.
यापूर्वीही परिसरात रेल्वे अपघात, वाहनांच्या धडका तसेच शिकाऱ्यांनी लावलेल्या फासांमध्ये अडकून बिबट्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकतीच तुरळ येथे एका बिबट्याचा फासकीत अडकून मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, गव्यांच्या वाढत्या संख्येमुळेही अनेक गंभीर घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी गवे विहिरीत पडल्याच्या घटनांनी परिसर हादरला होता. वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने या गव्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असले, तरी काही गव्यांचा अपघातांमध्ये मृत्यूही झाला आहे.
अशातच जांभूळवाडी ते कुंभारखणी मुख्य रस्त्यालगत असलेल्या मैदानात गव्यांचा मोठा कळप मुक्तपणे फिरताना काही वाहनचालकांच्या निदर्शनास आला. भरवस्तीच्या जवळ आणि दिवसाढवळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात गव्यांचा वावर दिसल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन, बिबटे आणि गव्यांचा मानवी वस्तीकडे होणारा वावर रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता संगमेश्वर तालुक्यातून जोर धरू लागली आहे.

