( संगमेश्वर/ प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली गावाचे सुपुत्र आणि आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते श्री. सुनिल शंकर जाधव यांना एशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटीच्या लिटरेचर अँड सोशल वर्क विभागातर्फे होनरेबल डॉक्टरेट ही सन्माननीय पदवी देऊन गौरवण्यात आले.
तमिळनाडूतील होसूर येथे नुकत्याच पार पडलेल्या दीक्षांत समारंभात डॉ. जाधव यांना ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. सामाजिक कार्य, साहित्य आणि आंबेडकरी विचारसरणीच्या प्रचारक म्हणून त्यांचे योगदान लक्षवेधी ठरले असून, त्यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. डॉ. जाधव हे धम्मक्रांती जलसा कलामंच, रत्नागिरीचे सल्लागार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच, महाराष्ट्र या संस्थेचे मार्गदर्शकही आहेत. साहित्यिक, कवी, लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी विविध माध्यमांतून सामाजिक जागृती घडवून आणली आहे. स्त्रीविषयक प्रश्नांवरही त्यांनी प्रभावी भूमिका घेत व्याख्यानांद्वारे जनजागृती केली आहे.
या उल्लेखनीय सन्मानाबद्दल डॉ. विक्रम शिंगाडे, मनोज जाधव, विजय मोहिते, अनिल जाधव, समीर शिगवण, वसंत कदम, मंगेश जाधव, किशोर भालेकर आणि शार्दुल जाधव यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक कार्याच्या माध्यमातून नवनिर्माणाचा ध्यास बाळगणाऱ्या डॉ. जाधव यांचा हा सन्मान अंत्रवली गावासाठी आणि संपूर्ण कोकणासाठी अभिमानास्पद ठरला आहे.