(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी पोलिस दलाने चॅप्टर केस प्रकरणात आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल एका तरुणावर कठोर कारवाई करत त्याला थेट दिवाणी तुरुंगात पाठविले आहे. चॅप्टर केसअंतर्गत कारवाईनंतर आदेशभंग झाल्याने थेट कारावासाची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना मानली जात आहे.
साहिल समीर सोलकर (वय २६, रा. शेट्येनगर, रत्नागिरी) असे कारावासात पाठविण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात बीएनएसएस कलम ४९१ अंतर्गत ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली होती. त्यानुसार ७ जानेवारी २०२५ रोजी तो सुनावणीस हजर राहून त्याचा जबाब नोंदविण्यात आला होता. यावेळी त्याने कोणताही कायदेशीर सल्लागार नेमण्यास नकार देत, बंधपत्र भंगाची दंडाची रक्कम भरण्याची तयारी दर्शविली होती. त्याच्या विनंतीनुसार दंडाची रक्कम २५ हजार रुपयांवरून १० हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत वारंवार संधी देऊनही साहिल सोलकरने दंडाची रक्कम भरली नाही. तसेच त्याचा जामीनदारही आर्थिक अडचणी व दिवाळखोरीमुळे ही रक्कम भरण्यास असमर्थ ठरला.
या प्रकरणात एकूण दहा सुनावण्या झाल्या असून, त्यापैकी केवळ पाच वेळा साहिल सोलकर हजर राहिला. त्याच्या मालकीची कोणतीही जंगम मालमत्ता नसल्याने जप्तीसाठी काढण्यात आलेले वॉरंटही निष्फळ ठरले. या सर्व बाबींचा सखोल विचार करून, संबंधित तरुणाला ३ जुलै २०२६ पर्यंत किंवा दंडाची संपूर्ण रक्कम भरून नवीन जामीनदार सादर करेपर्यंत रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वारंवार संधी देऊनही बंधपत्रातील अटींचे पालन न करणे आणि दंडाची रक्कम न भरल्याने अतिरिक्त पोलिस अधीक्षक तथा विशेष दंडाधिकारी बी. बी. महामुनी यांनी साहिल सोलकर याला दिवाणी कारावासात ठेवण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे चॅप्टर केस आदेशांचे पालन न केल्यास कठोर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट संदेश पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

