(रत्नागिरी / वार्ताहर)
सामाजिक कार्यकर्ते जकी खान यांच्या नेतृत्वाखाली मसिहा फाउंडेशन आणि शिवखोल फ्रेंड्स सर्कल, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रत्नागिरी शहर आणि परिसरातील युवक तसेच महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 166 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक कार्याला मोलाचा हातभार लावला.
रक्तदान शिबिरांसाठी सातत्याने ओळखले जाणारे जकी खान यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. रक्ताचा तुटवडा आणि रुग्णसंख्येत वाढ लक्षात घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करण्यात आला आहे.
शिबिराचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. मसिहा फाउंडेशन आणि शिवखोल फ्रेंड्स सर्कलचे पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय पथक आणि रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी, रक्तदाते आणि वैद्यकीय पथकाचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले.

