(दापोली)
दापोली तालुक्यातील गव्हे गावात नागाच्या दंशामुळे ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिप्ती जितेंद्र काजरेकर (वय ४५, रा. गव्हे) यांना रविवारी पहाटेच्या सुमारास नागाने दंश केला. दंशानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच सकाळी सुमारे ५.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गव्हे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर सर्पमित्र किरण करमरकर आणि सुरेश खानविलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास संबंधित नागाला सुरक्षितरीत्या पकडून रेस्क्यू केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
या प्रकरणी दिपक भिकू बेनेरे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी श्री. नलावडे करत आहेत.

