(सांगली)
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात विम्याचे ३० लाख रुपये मिळविण्यासाठी सख्ख्या बहिणीच्या पतीचा सुपारी देऊन खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला हा मृत्यू अपघात असल्याचे मानले जात होते, मात्र पोलिसांच्या सखोल तपासातून हा खून असल्याचे स्पष्ट झाले असून दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
ही घटना १९ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चोरोची (ता. कवठेमहांकाळ) येथील विजापूर–गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील प्रेम ढाब्याजवळ घडली. दत्तात्रय भगवान चावरे (वय ४४, रा. सांगली) यांचा मृतदेह गटारीत आढळून आला होता. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने हा अपघाती मृत्यू असल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळ पंचनामा आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर मृत्यू अपघातामुळे नसून गंभीर मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून मृताच्या पत्नीच्या भावानेच हा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्नीला विम्याचे ३० लाख रुपये मिळावेत तसेच कौटुंबिक वादातून सुटका व्हावी, या उद्देशाने रामचंद्र खिलारे (रा. विश्रामबाग, सांगली) यांनी तुकाराम सांगोलकर (रा. जत) याला ३ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे उघड झाले.
या सुपारीपैकी १ लाख रुपये टँकर कर्जाचा हप्ता भरण्यासाठी देण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यानंतर दत्तात्रय चावरे यांना संशयितांच्या ताब्यात देण्यात आले आणि १९ मे रोजी लोखंडी टॉमीने डोक्यावर वार करून त्यांचा खून करण्यात आला. नंतर मृतदेह गटारीत टाकून तो अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या प्रकरणाचा उलगडा पोलीस हवालदार श्रीमंत करे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे झाला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता संपूर्ण कट उघड झाला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलिसांनी केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

