(दापोली)
सरस्वती विद्यामंदिर जालगाव येथे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते ५३ वे तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शन विज्ञानदिंडीने शानदार उद्घाटन झाले. हे प्रदर्शन शिक्षण विभाग, पं.स.दापोली आणि सिध्दी शिक्षण संस्थेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे.
दि. ४ डिसेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते तसेच संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष समीर गुजराती यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. उद्घाटन सोहळा विज्ञानदिंडीच्या रंगतदार वातावरणात पार पडला. या विज्ञानप्रदर्शनात सुमारे १९५ प्रतिकृतींचे सादरीकरण करण्यात आले असून, बालवैज्ञानिकांच्या कल्पनेला व कौशल्याला प्रोत्साहन देणारा असा हा उपक्रम ठरला आहे.
उद्घाटन सोहळ्यात मंत्री योगेश कदम यांनी बालवैज्ञानिकांच्या प्रयत्नांचे कौतुक करत सांगितले की, भविष्यात दापोली येथून उदयास येणाऱ्या या बालवैज्ञानिकांची प्रगती देशासाठी यशदायी आणि फलदायी ठरेल. त्यांनी पालक व शिक्षक यांच्याही प्रेरणेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी विजयकुमार सुर्यवंशी, तहसिलदार अर्चना बोंबे, माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, दापोली माजी सभापती किशोर देसाई, मा.उपसभापती उन्मेष राजे, नगराध्यक्षा कृपा घाग, ममता शिंदे, तसेच सरस्वती विद्यामंदिर संस्थेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश सागवेकर, सदस्य गजानन दाभोळे, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, संघटना पदाधिकारी, मुख्याध्यापिका सारिका गुजराती, विश्वजीत तांबे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष उल्लेखनीय म्हणजे सरस्वती विद्यामंदिर येथील काजू प्रक्रिया उपक्रमाला “इन्स्पायर अवार्ड” स्पर्धेत उत्कृष्ट म्हणून निवडले गेले आणि त्याचा विशेष सत्कार मंत्री योगेश कदम यांनी केला.
गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, “विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी S.T.E.M.” या विषयाची निवड ही केवळ शैक्षणिक उपक्रम नसून भविष्यातील भारताचा मजबूत पाया घालण्याची दृष्टी आहे. Science, Technology, Engineering, Mathematics — ही चार अक्षरे आजच्या जागतिक स्पर्धेचे केंद्रबिंदू ठरली आहेत. या चारही क्षेत्रातील समन्वयाने नव्या कल्पना जन्म घेतात, संशोधनाचा मार्ग मोकळा होतो आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल अधिक वेगाने होते.
त्यांनी पुढे सांगितले की, आजचे विज्ञानप्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, जिज्ञासा आणि चिंतनशक्तीचे कौतुकास्पद व्यासपीठ आहे. येथे साकारलेले प्रत्येक मॉडेल, प्रयोग आणि नवकल्पना आपल्या देशाच्या विकसित भारताच्या स्वप्नाला बळ देणारी मूल्यवान पायरी आहे. नवी ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, पर्यावरण संवर्धन, शेती, आरोग्य, अंतराळ अशा अनेक क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी दाखवलेले कौशल्य निश्चितच अभिमानास्पद आहे.
संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि स्वागत शशिकांत बैकर आणि त्यांच्या समितीने केले. प्रारंभी ढोलताशांच्या गजरात ग्रंथ पालखीने जालगाव केंद्रशाळा ते सरस्वती विद्यामंदिर असा विज्ञानदिंडीचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये गटशिक्षणाधिकारी, विज्ञान प्रदर्शन नोडल ऑफिसर बळीराम राठोड, तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी सांगितले की, “भारताच्या प्रगतीचा मार्ग विज्ञानातूनच जातो, आणि विज्ञानाचा विकास युवा पिढीच्या उत्सुकतेतून घडतो. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या हातून घडणाऱ्या नव्या कल्पनांचा प्रकाश भविष्यातील भारत उजळवेल. आपण सर्व मिळून S.T.E.M. शिक्षण अधिक सक्षम करू, तरच विकसित, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला आणि आत्मनिर्भर भारत घडवू शकतो.”
हा तीन दिवसांचा विज्ञानसोहळा दापोली तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि स्थानिक समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

