(संगमेश्वर / एजाज पटेल)
आज (शनिवारी) संध्याकाळी फणसवणे आणि परिसरावर निसर्गाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसर अंधाराने व्यापला गेला. त्यानंतर सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह विजांच्या प्रचंड कडकडाटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कानठळ्या बसवणारा आवाज आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या विजांच्या लखलखाटामुळे परिसरात मोठी दुर्घटना घडल्याची भीती व्यक्त होत होती.
घराशेजारील माडांवर कोसळली वीज; क्षणार्धात पेटली आग
दरम्यान, फणसवणे परिसरातील कोचेवाडी येथे अचानक एकच खळबळ उडाली. येथील रहिवासी सिकंदर मुल्ला आणि इसाक मोडक यांच्या घराशेजारी असलेल्या उंच नारळाच्या झाडांवर प्रचंड वीज कोसळली. विजेचा जबरदस्त आघात होताच दोन्ही माडांनी क्षणार्धात पेट घेतला. आगीच्या प्रचंड ज्वाला आणि धुराचे काळेकुट्ट लोट थेट आकाशाच्या दिशेने गेल्याचे भीषण दृश्य पाहून ग्रामस्थांमध्ये घबराट होऊन एकच धावपळ उडाली.
घरांच्या अगदी जवळ लागलेली आग पाहून नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. वादळी वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाला आणखी भडकत होत्या आणि त्या शेजारील घरांच्या दिशेने सरकत असल्याने मोठ्या अनर्थाची भीती निर्माण झाली होती.
पावसाची उशिरा हजेरी; वाऱ्याने वाढवला धोका
माडांना आग लागल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू होईल आणि आग विझेल, अशी आशा ग्रामस्थांना होती. मात्र सुरुवातीला पावसाने पूर्णपणे दडी मारली. उलट सुसाट वाऱ्यामुळे आगीने अधिकच रौद्ररूप धारण केले. मानवी प्रयत्नांनी इतक्या उंच झाडांवरील आग विझवणे अशक्य बनले होते. त्यामुळे संपूर्ण वस्तीवर संकटाचे सावट निर्माण झाले होते.
मजीद नेवरेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच फणसवणे परिसराध्यक्ष शब्बीर धामस्कर यांनी तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मजीद नेवरेकर यांना याची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मजीद नेवरेकर यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
आगीच्या धगधगत्या ज्वालांमध्ये भयभीत झालेल्या नागरिकांना त्यांनी धीर दिला. संकटाच्या काळात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, घाबरू नका, असे सांगत त्यांनी ग्रामस्थांना मानसिक आधार दिला.
वरुणराजाच्या आगमनाने टळला मोठा अनर्थ
आगीचा धोका वाढत असतानाच अखेर निसर्गाने साथ दिली. प्रचंड गडगडाटासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आणि काही वेळातच दोन्ही माडांवरील आग पूर्णपणे विझली. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. जर पावसाला आणखी काही मिनिटांचा विलंब झाला असता, तर वाऱ्यामुळे ही आग थेट शेजारच्या घरांपर्यंत पोहोचून मोठी दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया मजीद नेवरेकर यांनी व्यक्त केली.
निसर्गाच्या इशाऱ्याने नागरिक सतर्क
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घराशेजारील माड अक्षरशः जळून खाक झाल्याने नागरिक अजूनही धास्तावलेल्या अवस्थेत आहेत. विजांचा वाढता धोका लक्षात घेता पावसाळ्यात नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचेही या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

