(रत्नागिरी / प्रतिनिधी)
‘तुमच्या बँक खात्यातून तीन कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे, चौकशीसाठी तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे’ अशी भीती दाखवत एका व्यक्तीची तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीविरुद्ध रत्नागिरी सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील एका आरोपीला दिल्ली-नोएडा परिसरातून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या धोक्याचे गंभीर चित्र समोर आणणाऱ्या या प्रकरणात आरोपींनी स्वतःला बंगळुरू पोलीस, सीबीआय अधिकारी तसेच नवी दिल्लीतील केंद्रीय यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासविले. फिर्यादी यांच्या नावाने कॅनरा बँक, माटुंगा (मुंबई) शाखेतील खात्यातून तब्बल तीन कोटी रुपयांचा फ्रॉड झाल्याचा बनाव रचत त्यांना डिजिटल अरेस्टची भीती दाखविण्यात आली.
भीती आणि मानसिक दबाव निर्माण करून आरोपींनी ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी विविध कारणे सांगत पैशांची मागणी केली. या भूलथापांना बळी पडलेल्या फिर्यादींकडून एकूण १ कोटी २३ लाख रुपये उकळण्यात आले. फसवणूक लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी येथे गुन्हा क्रमांक ०२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(२), ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६(डी) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण, डिजिटल पुरावे आणि स्थानिक बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींचा माग काढला. या तपासादरम्यान गगनदीप भारद्वाज (रा. नोएडा, दिल्ली) याला ताब्यात घेण्यात आले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस हवालदार संदीप नाईक आणि पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम यांनी तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
दरम्यान, अशा प्रकारच्या ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे. “कोणतीही व्यक्ती स्वतःला पोलीस, सीबीआय, राष्ट्रीय सुरक्षा विभाग किंवा इतर सरकारी यंत्रणेचा अधिकारी असल्याचे सांगून बँक खाते, सिमकार्ड किंवा आर्थिक व्यवहारांबाबत चौकशीच्या नावाखाली माहिती मागत असेल, तर त्यावर विश्वास ठेवू नका. अकाऊंट पडताळणीसाठी पैसे हस्तांतरित करण्याची मागणी केल्यास तात्काळ सावध व्हा. कोणालाही वैयक्तिक अथवा बँक खात्याची माहिती देऊ नका आणि त्वरित जवळच्या पोलीस ठाणे किंवा सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा,” असे आवाहन त्यांनी केले.

