(कणकवली/ रत्नागिरी प्रतिनिधी)
सिंधुदुर्गातील राजकीय घडामोडींना वेग देणाऱ्या एका महत्त्वाच्या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीसंदर्भात पुन्हा हालचाली सुरू झाल्याचे समोर आले आहे. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कणकवली नगरपंचायतीकडे पत्र पाठवत नाईक यांनी खरेदी केलेल्या गाळ्यांबाबत सविस्तर माहिती मागविल्याने या प्रकरणाची पुन्हा चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कणकवली शहरातील वैभव नाईक यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेबाबत एसीबीकडून पडताळणी सुरू असून, संबंधित गाळा एक आहे की दोन, याबाबत स्पष्ट माहिती सादर करण्याचे निर्देश नगरपंचायतीला देण्यात आले आहेत. या संदर्भातील पत्र एसीबीच्या पोलीस उपअधीक्षकांकडून मुख्याधिकाऱ्यांना पाठविण्यात आले असल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित गाळ्यांची खरेदी २००२ आणि २००६ या कालावधीत करण्यात आली होती. दरम्यान, २०२२ पासून वैभव नाईक यांच्या अपसंपदा (Disproportionate Assets) प्रकरणी रत्नागिरी एसीबीमार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या अनुषंगाने गेल्या काही वर्षांत त्यांच्याशी संबंधित अनेक व्यक्तींचे जबाब नोंदविण्यात आले असून विविध बाबींची पडताळणी करण्यात आली आहे.
या नव्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना वैभव नाईक यांनी चौकशीला आपला कोणताही विरोध नसल्याचे स्पष्ट केले. “२०२२ पासून चौकशी सुरू आहे. त्यावेळीही मी पूर्ण सहकार्य केले आणि आजही करत आहे. अधिकारी बदलतात, राजकीय परिस्थिती बदलते आणि त्यानुसार पुन्हा चौकशी सुरू होत असते. मात्र, गेल्या पाच वर्षांत सातत्याने माझ्याच संदर्भात चौकशी होत राहणे अन्यायकारक वाटते,” असे ते म्हणाले.
नाईक यांनी पुढे सांगितले की, “कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत. कोणत्याही दबावाला बळी पडण्याचा प्रश्नच नाही. संबंधित यंत्रणांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे कायदेशीर आणि वस्तुनिष्ठ उत्तर देऊ. सत्य लपविण्याचे कोणतेही कारण नाही.” तसेच, स्वतःबरोबर सुरू झालेल्या इतर अनेक चौकशा कालांतराने बंद झाल्या असताना केवळ आपल्या प्रकरणातील चौकशीच अद्याप सुरू असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. “फक्त माझीच चौकशी वर्षानुवर्षे सुरू राहणे हा अन्याय आहे. मात्र, या विरोधातही मी कायदेशीर मार्गाने लढा देईन आणि चौकशी प्रक्रियेला पूर्ण सहकार्य करत राहीन,” असे नाईक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एसीबीकडून मागविण्यात आलेली माहिती आणि त्यानंतर होणारी पुढील कार्यवाही याकडे सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, या प्रकरणातील पुढील घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

