(मुंबई)
आगामी एशियन गेम्स २०२६ स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केलेल्या भारतीय संघाने क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगवली आहे. यंदा जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी बीसीसीआयने दुय्यम किंवा प्रयोगशील संघ पाठवण्याऐवजी पूर्ण ताकदीचा संघ मैदानात उतरवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, मागील एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या संघातील बहुतांश खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवत निवड समितीने मोठा संदेश दिला आहे.
मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत अनेक धक्कादायक निर्णय घेण्यात आले. टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला संघाबाहेर ठेवण्यात आले असून, त्याच्या जागी सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर श्रेयस अय्यर याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. आयपीएलमध्ये सलग दोन हंगाम संघाला अंतिम फेरीपर्यंत नेण्याची कामगिरी करणाऱ्या अय्यरच्या नेतृत्वगुणांवर निवडकर्त्यांनी विश्वास दाखवला आहे. युवा फलंदाज तिलक वर्मा याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली असून, भविष्यातील नेतृत्वासाठी त्याला तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
चार वर्षांपूर्वी हँगझू एशियन गेम्समध्ये ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारताने युवा खेळाडूंनी सजलेला संघ पाठवला होता. त्या संघाने सुवर्णपदक जिंकत देशाची मान उंचावली होती. मात्र, यंदा निवड समितीने पूर्णपणे वेगळी रणनीती स्वीकारली आहे. मागील संघातील तब्बल ११ खेळाडूंना वगळण्यात आले असून, त्याऐवजी टी-२० विश्वचषक विजेत्या संघातील अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झालेले खेळाडू संघात दाखल झाले आहेत.
जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि वरुण चक्रवर्ती यांसारखे खेळाडू यंदा भारतीय संघाची ताकद वाढवताना दिसणार आहेत. त्यामुळे सुवर्णपदक कायम राखण्याचा भारताचा निर्धार स्पष्ट झाला आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या संघात केवळ पाच खेळाडू असे आहेत जे विश्वचषक विजेत्या संघाचा भाग नव्हते. श्रेयस अय्यर, नितीश रेड्डी, रवी बिश्नोई, हर्षित राणा आणि युवा सनसनाटी वैभव सूर्यवंशी यांचा त्यात समावेश आहे. हर्षित राणा दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेला मुकला होता, तर वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजी आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय संघात स्थान मिळवले आहे.
भारताने एशियन गेम्समध्ये यापूर्वी सुवर्णपदकाची कमाई केली असून, यंदा अधिक बलाढ्य आणि अनुभवी संघासह मैदानात उतरताना भारतीय संघावर अपेक्षांचे ओझे अधिक वाढले आहे. मात्र, संघातील अनुभव, युवा जोश आणि नेतृत्वाचा योग्य समन्वय पाहता भारत पुन्हा एकदा सुवर्णपदकाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे.
एशियन गेम्स २०२६ साठी भारतीय संघ :
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह.

