(मुंबई)
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाट परिसरात गॅस टँकर उलटून झालेल्या अपघातामुळे निर्माण झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी द्रुतगती महामार्गासाठी स्वतंत्र आपत्कालीन वाहतूक आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी एमएसआरडीसी आणि पोलिसांना दिले आहेत.
प्रोपोलीन गॅस गळतीमुळे मोठा धोका
अपघातानंतर टँकरमधून ज्वलनशील प्रोपोलीन गॅसची गळती सुरू झाली होती. त्यामुळे मोठा स्फोट होण्याची आणि जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. या धोक्यामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक तातडीने जुन्या मुंबई–पुणे महामार्गाकडे वळवावी लागली, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. एमएसआरडीसी, पोलीस आणि तज्ज्ञ पथकांनी जवळपास 20 तास अथक प्रयत्न करून गॅस गळतीवर नियंत्रण मिळवलं. ही कारवाई अत्यंत आव्हानात्मक होती, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
तज्ज्ञांची मदत, मोठा अनर्थ टळला
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) मदत घेण्यात आली. तसेच भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि रिलायन्स या कंपन्यांचे तांत्रिक तज्ज्ञ घटनास्थळी बोलावण्यात आले. या पथकांनी समन्वयाने काम करत गॅस गळती रोखली आणि संभाव्य मोठा अपघात टाळला.
या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका लांब पल्ल्याच्या प्रवाशांना, खासगी बसेस, मालवाहतूक वाहनांना तसेच अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना बसला आहे. अनेक प्रवासी पाणी, अन्न आणि शौचालयाच्या सुविधांशिवाय अडकून पडल्याने नाराजी व्यक्त करत आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी एकमेकांना मदतीचा हात देत पाणी व अन्न वाटप केल्याचेही चित्र दिसत आहे. प्रशासनाकडून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच महामार्गावरील सर्व लेन खुल्या करण्यात येतील, असं स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे द्रुतगती मार्गावरील आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षाव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
प्रवाशांसाठी सुविधा, टोल वसुली स्थगित
वाहतूक कोंडीमुळे अडकलेल्या प्रवाशांना एमएसआरडीसीकडून पिण्याचे पाणी, बिस्किट्स आदी सुविधा पुरवण्यात आल्या. सर्व अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरून मदतकार्य करत होते, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रवाशांना झालेला त्रास लक्षात घेता, वाहतूक पूर्वपदावर येईपर्यंत मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसुली तात्पुरती थांबवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
‘मिसिंग लिंक’ प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे आदेश
मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, तो लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले. ही लिंक सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ कमी होईल, तसेच अशा आपत्कालीन प्रसंगी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपत्कालीन आराखड्यावर भर
या संपूर्ण घटनेनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी एमएसआरडीसी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून द्रुतगती महामार्गासाठी एक सुस्पष्ट आपत्कालीन वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात अशा घटना घडल्यास प्रवाशांना कमीत कमी त्रास व्हावा, हा या आराखड्याचा मुख्य उद्देश असेल.

