(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मंगळवारी आणखी राजकीय रंग चढला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आणि कथित लाठीमाराच्या निषेधार्थ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींसह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा सर्वांची सुटका करण्यात आली.
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेसने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याचबरोबर या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले
लोक कल्याण मार्गावर आंदोलन सुरू असताना दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी राहुल गांधींना ताब्यात घेत असताना त्यांना ओढत नेल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. ताब्यात घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “भारतात सध्या लोकशाही सुरू आहे.”
प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल
ताब्यात घेतले जात असताना प्रियंका गांधी वाड्रा यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत म्हटले, “ते भित्रे आहेत. ते घाबरलेले आहेत. आम्हाला त्यांची भीती वाटत नाही. उलट तेच आम्हाला घाबरले आहेत.”
संसदेतून थेट आंदोलनस्थळी मोर्चा
संसदेत या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरल्यानंतर राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी आणि इतर नेते पायी चालत पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ पोहोचले. तेथे त्यांनी तीन तासांहून अधिक काळ ठिय्या आंदोलन केले. या वेळी राहुल गांधी यांनी परीक्षा व्यवस्थेवर टीका करत, अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांमुळे धोक्यात आल्याचा आरोप केला. तसेच या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.
मंत्री जितेंद्र सिंह यांची भेट, तरीही आंदोलन कायम
आंदोलनादरम्यान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. मात्र चर्चेनंतरही काँग्रेसने आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. अखेर तीन तासांनंतर दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या अनेक खासदारांसह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिरा सर्वांची सुटका करण्यात आली.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टद्वारे राहुल गांधी यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या चर्चेचा तपशील मांडला आहे. सरकारने NEET आणि संबंधित आंदोलनाशी निगडित सर्व मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सहमती दर्शवल्यानंतरही राहुल गांधी यांनी भूमिका बदलल्याचा आरोप त्यांनी केला.
जितेंद्र सिंह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “राहुल गांधी यांनी मागणी केली होती की, सरकारने NEET आणि संबंधित आंदोलनाशी निगडित सर्व मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सहमती दर्शवली, तर ते तात्काळ आंदोलन मागे घेतील. त्यानंतर सरकारच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना कळविण्यात आले की, ही मागणी मान्य करण्यात आली असून सरकार संसदेत या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. ही माहिती दिल्यानंतर राहुल गांधी यांनी केवळ चर्चा पुरेशी नसल्याचे सांगत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. यापूर्वी त्यांनी केवळ चर्चेची मागणी केली होती, याची आठवण करून दिल्यावर त्यांनी ‘आता आमच्या मागण्या बदलल्या आहेत,’ असे उत्तर दिले. राहुल गांधींसारख्या वरिष्ठ नेत्याने स्वतःच्या शब्दांपासून माघार घेणे दुर्दैवी आहे. ही भूमिका लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांशी सुसंगत नाही.”
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेस आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यापेक्षा राजकीय अस्थिरता निर्माण करणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट असल्याचा दावा त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वरील पोस्टद्वारे केला.
धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “राहुल गांधी आणि काँग्रेस पावसाळी अधिवेशनादरम्यान अशांतता निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांचा निर्लज्जपणे राजकीय साधन म्हणून वापर करत आहेत. त्यांनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन करत पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागला.”
“सरकारने NEET आणि विद्यार्थ्यांशी संबंधित सर्व मुद्द्यांवर संसदेत सर्वसमावेशक चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, काँग्रेसने लोकशाही चर्चेचा मार्ग स्वीकारण्याऐवजी राजकीय तमाशा करण्याचा पर्याय निवडला. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे हे त्यांचे ध्येय नसून, राजकीय लक्ष वेधण्यासाठी अशांतता निर्माण करणे हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. राहुल गांधींसाठी हा विद्यार्थ्यांच्या हिताचा प्रश्न नाही. चर्चेचे सर्व मार्ग खुले झाल्यानंतरही संघर्ष निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.”
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारची भूमिका स्पष्ट करत त्यांनी म्हटले, “आमचे सरकार NEETसह विद्यार्थ्यांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यास आणि तरुणांच्या प्रत्येक रास्त चिंतेचे निराकरण करण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहे. भारतातील विद्यार्थ्यांचा राजकीय प्रचारासाठी प्याद्यांसारखा वापर होऊ नये. त्यांना गोंधळाऐवजी निश्चितता, घोषणांऐवजी ठोस उपाय आणि अशांततेऐवजी उत्तरदायित्व मिळायला हवे. आपण आपल्या विद्यार्थ्यांना केवळ संताप नव्हे, तर योग्य उत्तरे, आवश्यक सुधारणा आणि जबाबदार शासन देणे आवश्यक आहे. आमचे सरकार यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.”

