(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या १५ पोलीस अंमलदारांना नुकतीच पदोन्नती प्रदान करण्यात आली. रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित विशेष समारंभात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते पदोन्नतीप्राप्त अंमलदारांच्या गणवेशावर स्टार आणि फिती लावून त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी पदोन्नती मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
पोलीस दलातील अंतर्गत पदोन्नती प्रक्रियेनुसार सात अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) पदावर, तर आठ अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली. पदोन्नतीमुळे संबंधित अंमलदारांवर अधिक जबाबदारी येणार असली तरी त्यांच्या सेवाभिमानाला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती प्राप्त झालेल्यांमध्ये स्नेहल पेढांमकर, विद्या साळवी, स्वाती राणे, अक्षया बागवे, किशोरी गंगावणे, उमेश बागवे आणि स्वप्नील तळेकर यांचा समावेश आहे. तर दत्तात्रय कांबळे, ज्योती धामणस्कर, मनोज शिंदे, रेखा दिवे, शंकर ठोंबरे, नैना गावीत, तेजस्वी गांधी आणि राजेंद्र नलावडे यांना पोलीस हवालदार पदावर बढती देण्यात आली.
या समारंभाला जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, विविध शाखांतील अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदोन्नती प्राप्त सहकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करत सर्वांनी त्यांच्या भावी सेवाकार्यासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी पोलीस दलातील या पदोन्नतीमुळे कार्यक्षमतेला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच दलातील मनोबल अधिक उंचावण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.

