(गुहागर / रत्नागिरी)
गुहागर-पिंपर फाटा मार्गावर झालेल्या भीषण स्कुटर अपघातात २४ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विरेंद्र सुभाष घाडे (वय २४, रा. उंबराठ घाडेवाडी, ता. गुहागर, सध्या रा. सांताक्रूझ, मुंबई) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात ७ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गुहागर-पिंपर फाटा रस्त्यावर मौजे वाडदई येथे घडला. विरेंद्र घाडे हा स्वतःची सुझुकी बर्गमन स्कुटर (MH 02 GF 0370) घेऊन बोऱ्या फाटा ते पिंपर फाटा मार्गाने जात होता. दरम्यान, रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता भरधाव वेगात वाहन चालवल्याने स्कुटरवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला.
या अपघातात विरेंद्रच्या डोक्याला, कपाळाला, नाकाला तसेच तोंडाला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्याला तातडीने मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
सुरुवातीला या प्रकरणाची नोंद भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर पुढील तपासासाठी प्रकरण गुहागर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पोस्टमार्टम अहवालात ‘अपघातामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू’ झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, स्वतःच्या निष्काळजीपणामुळे व भरधाव वेगामुळे स्वतःच्या मृत्यूस आणि मालमत्तेच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात महिला पोलीस हवालदार स्वामिनी नाटेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

