(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील पावस पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते, कुणबी समाज नेते आणि शिंदे गट शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुनील गोपाळ नावले यांचे सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्याने दुःखद निधन झाले. दुपारीपर्यंत सर्वांशी गाठीभेटीत व्यस्त असलेले, मोर्चात उत्साहाने घोषणा देत असलेले आणि समाजकारणात नेहमी पुढाकार घेणारे हे व्यक्तिमत्व संध्याकाळपर्यंत या जगातून निघून गेले. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली असून या धक्कादायक घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
ओबीसी समाजाच्या आरक्षण मोर्चात सहभाग घेतल्यानंतर नवले यांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर केले. त्यानंतर त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयात भेट देऊन काही कामे पूर्ण केली आणि घरी परतले. घरी जेवल्यानंतर थोडे अस्वस्थ वाटल्याने ते रिक्षामधून जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे उपचार घेण्याकरिता निघाले. मात्र रिक्षामध्ये अचानक त्यांना चक्कर येऊन प्रकृती बिघडली. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यापूर्वी तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली.
सुनील नावले हे केवळ सामाजिक कार्यकर्ते नव्हते, तर राजकीय क्षेत्रातही सक्रिय होते. त्यांनी पंचायत समितीमध्ये उपसभापती पद भूषवले होते. संघटन कौशल्य, कार्यतत्परता आणि लोकसंग्रह यामुळे त्यांनी पावस पंचक्रोशीतील जनतेत आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. ते संजय गांधी निराधार योजना रत्नागिरी तालुका अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते आणि समाजातील गरजू, उपेक्षित व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले. त्यांच्या नेतृत्वाखालील समितीने तहसीलदार कार्यालयात पार पडलेल्या पहिल्या सभेत एकूण १८३ अर्जांना मंजुरी दिली होती. सामाजिक कार्याबरोबरच ते आंबा बागायतदार म्हणूनही त्यांची ख्याती होती. पालकमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय म्हणून ते परिचित होते.
त्यांच्या अचानक निधनाने समाजात आणि पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. जो माणूस दुपारी आपल्या समोर चालतो, बोलतो तो काही तासांतच कायमचा दूर जातो, अशा दुखद भावना सर्वत्र व्यक्त होत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे.

