(फुणगूस / एजाज पटेल)
फुणगूस ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, कर वसुलीतील निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या नागरिकांना पावती पुस्तिका व नोंदवही उपलब्ध नसल्याचे सांगत परत पाठवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. “नवं वर्ष सुरू झालंय, आमच्याकडे रजिस्टर नाही आणि वसुली पुस्तिकाही नाही,” असे उत्तर देऊन कर्मचाऱ्यांनी नागरिकांना माघारी पाठवले गेले.
नवीन आर्थिक वर्ष सुरू होऊनही वसुलीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. एकीकडे थकीत कराबाबत ग्रामस्थांवर जबाबदारी टाकली जात असताना, प्रत्यक्षात कर भरण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांना सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले आहे.
दरम्यान, मागील काही महिन्यांत वीज बिल न भरल्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या. यावेळी ग्रामस्थांकडून कर वसुली होत नसल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. मात्र, स्थानिकांच्या मते वसुलीबाबत प्रशासनाकडून पुरेसे प्रयत्न होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, वसुली मोहिमेचा अभाव आणि नियोजनातील त्रुटी यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे. कर भरण्यासाठी नागरिक पुढाकार घेत असताना त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने तातडीने आवश्यक व्यवस्था करून वसुली प्रक्रिया सुरळीत करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा, या प्रश्नावर तीव्र भूमिका घेण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

