(पोलादपूर / रायगड)
पोलादपूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून 85 वर्षीय वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी तिच्या नातवाला अटक करण्यात आली आहे. दागिन्यांच्या हव्यासातून हे कृत्य झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आंबेनळी घाट परिसर पुन्हा एकदा गंभीर गुन्हेगारी घटनेमुळे हादरला आहे. अलिबाग येथील एका युवकाने स्वतःच्या सख्ख्या आजीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी संशयित नातवाला ताब्यात घेतले असून त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते. मृत महिलेचे नाव सुनंदा पाटील (वय 85) असल्याची माहिती मिळत आहे. सुनंदा पाटील या सारलगाव येथे वास्तव्यास होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली. हत्येनंतर मृतदेह महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटातील बावली टोक ते दाभिल टोक दरम्यानच्या परिसरात १०० फूट खोल दरीत फेकण्यात आला होता. पोलिस तपासादरम्यान संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता, त्याने गुन्हा कबूल करत मृतदेह फेकलेले ठिकाणही दाखवले. घटनास्थळ अत्यंत दुर्गम आणि धोकादायक असल्याने मृतदेह बाहेर काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले. अखेर स्थानिक रेस्क्यू पथकांच्या मदतीने मृतदेह शोधमोहीम राबवण्यात आली.
भर पावसात १०० फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर
पोलादपूर पोलिस ठाण्यातून गुरुवारी सकाळी मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे पथक तातडीने आंबेनळी घाटात दाखल झाले.
मृतदेह नेमका कुठे फेकला आहे याची स्पष्ट माहिती नसल्याने पथकाने सुमारे दीड तास शोधमोहीम राबवली. अखेर काळ्या पिशवीत गुंडाळलेला मृतदेह १०० फूट खोल दरीत आढळून आला.
मुसळधार पाऊस, निसरडा उतार आणि धोकादायक भौगोलिक परिस्थिती असूनही रेस्क्यू टीमने रोप-रॅपलिंग तंत्राचा वापर करत खोल दरीत प्रवेश केला. सुमारे एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह सुरक्षितपणे वर काढण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले. मृत महिलेचा नातू आदर्श शेडगे यानेच तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकल्याचे उघड झाले.
या प्रकरणात दागिन्यांच्या लोभातून हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. अलिबाग पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
या घटनेमुळे रायगड आणि सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी याच घाटात झालेल्या भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच आता या क्रूर हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

