(रत्नागिरी /प्रतिनिधी)
गुन्हे तपासातील कार्यक्षमता, वेळेचे काटेकोर नियोजन आणि तपास प्रक्रियेतील समन्वय यामुळे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कायद्यानुसार विहित मुदतीत दोषारोपपत्रे (चार्जशीट) न्यायालयात सादर करण्यामध्ये जिल्हा पोलिसांनी शंभर टक्के यश मिळवले असून, जिल्हा पोलीस दलाच्या या कामगिरीची नोंद विशेष उल्लेखनीय ठरत आहे.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बागटे यांनी घेतलेल्या आढाव्यात ही बाब अधोरेखित झाली. १ जानेवारी २०२६ ते १८ मे २०२६ या कालावधीत दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांच्या तपासाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये दहा वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असलेले गुन्हे तसेच दहा वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असलेल्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. आढाव्यानुसार, दहा वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असलेल्या एकूण ७८० गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यापैकी ३२७ गुन्ह्यांमध्ये विहित ६० दिवसांच्या मुदतीत दोषारोपपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. उर्वरित ३२४ गुन्ह्यांमध्ये तपास सुरू असून, त्यांची कायदेशीर मुदत अद्याप पूर्ण झालेली नाही.
तसेच, दहा वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असलेल्या एकूण ४८ गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यापैकी २५ गुन्ह्यांमध्ये ९० दिवसांच्या मुदतीत दोषारोपपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत. उर्वरित २४ प्रकरणांमध्ये तपास सुरू असून, संबंधित मुदत अद्याप बाकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे, ज्या सर्व प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र सादर करण्याची कायदेशीर मुदत पूर्ण झाली होती, त्या प्रत्येक प्रकरणात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने शंभर टक्के प्रमाणात वेळेत दोषारोपपत्रे न्यायालयात दाखल केली आहेत.
गुन्हे तपासातील ही कामगिरी जिल्हा पोलीस दलाच्या संघटित कार्यपद्धतीचे आणि तपासातील काटेकोरपणाचे प्रतीक मानली जात आहे. वेळेत तपास पूर्ण करून दोषारोपपत्रे सादर केल्यामुळे न्यायप्रक्रियेलाही गती मिळण्यास मदत होत असल्याची प्रतिक्रिया कायदेविषयक वर्तुळातून व्यक्त होत आहे.

