(लांजा /रत्नागिरी प्रतिनिधी)
तालुक्यातील वेरळ गावात जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका प्रौढावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (३ जून) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या हल्ल्यात प्रभाकर उर्फ भाई जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वेरळ परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रभाकर जाधव आणि संशयित आरोपी यांच्यात पूर्वीपासून काही कारणावरून वाद सुरू होता. बुधवारी सायंकाळी दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक झाली. या वादाचे पर्यवसान हिंसक स्वरूपात होत आरोपीने संतापाच्या भरात कोयता उगारून जाधव यांच्यावर सपासप वार केल्याचे सांगितले जात आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात जाधव गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ते घटनास्थळीच कोसळले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली.
दरम्यान, हल्ल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तसेच विविध पुरावे संकलित केले. आरोपीचा माग काढण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यामागील नेमके कारण, पूर्ववैमनस्याचे स्वरूप आणि इतर संबंधित बाबींचा तपास सुरू असून या घटनेमुळे वेरळ गावासह परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

