(राजापूर / प्रतिनिधी)
तालुक्यातील हर्डी (खालची वाडी) येथे सामायिक जागेतील सागवानाची झाडे तोडण्याच्या कारणावरून नातेवाईकांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर धक्काबुक्की आणि दगडफेकीत झाले. या घटनेत एक महिला जखमी झाली असून याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ममता नारायण पड्यार या घरालगत असलेल्या सामायिक जागेतील सागवानाची झाडे तोडत होत्या. त्यावेळी त्यांचे नातेवाईक असलेले सुरेश केशव पड्यार, शुभांगी सुरेश पड्यार, तृप्ती सुरेश पड्यार आणि सिद्धी सुरेश पड्यार हे तेथे आले. झाडतोडीच्या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला. वाद चिघळल्यानंतर आरोपींनी तक्रारदार आणि उपस्थित साक्षीदारांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. दरम्यान, आरोपींपैकी एका महिलेने संतापाच्या भरात दगडफेक केली. त्यामध्ये ममता पड्यार यांच्या अंगावर दगड लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत.
या घटनेनंतर तक्रारदारांनी राजापूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक १५५/२०२६ अन्वये संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांखाली तसेच इतर संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलिसांकडून सुरू असून झाडतोडीच्या वादातून उफाळलेल्या या घटनेची परिसरात चर्चा रंगली आहे.

