(लांजा)
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी लांजा शहरातील रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या खोकेधारकांवर कारवाई करण्याची प्रशासनाची तयारी सुरू आहे. मात्र, पर्यायी व्यवस्था न करता कारवाई केल्यास उद्धवसेना हे कदापि सहन करणार नाही, असा इशारा तालुकाप्रमुख सुरेश करंबळे यांनी दिला आहे.
लांजा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वडापाव, चहा, भाजीपाला, कपडे अशा स्वरूपाचा लघु व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या सुमारे ३०० पेक्षा अधिक खोकेधारकांना प्रशासनाने अनधिकृत ठरवून हटविण्याचा निर्णय घेतल्याने या व्यावसायिकांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश करंबले यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यानंतर झालेल्या बैठकीत त्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला की, पर्यायी जागेविना हटविल्यास उद्धवसेना रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन उभारले जाईल.
बैठकीस तालुका युवा अधिकारी अभिजित राजेशिर्के, शहरप्रमुख मोहन तोडकरी, नितीन शेट्ये, माजी शहरप्रमुख सचिन लिंगायत, खोकेधारक संघटनेचे उपाध्यक्ष बाबू गुरव आणि सहकार नेते परवेझ घारे हे उपस्थित होते. नितीन शेट्ये यांनी यावेळी प्रशासनावर टीका करताना म्हटले की, महामार्गालगत अनेक मोठ्या इमारती व अनधिकृत बांधकामे सुरू आहेत, पण प्रशासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. मात्र, हातावर पोट असलेल्या सामान्य व्यावसायिकांवर मात्र तत्परतेने कारवाई करत आहे. ही भूमिका पक्षपाती आहे.
गणपती तोंडावर, पावसाचे दिवस; मग या व्यावसायिकांचे काय?
सुरेश करंबळे यांनी सांगितले की, सध्या पावसाळ्याचे दिवस असून काही दिवसांत गणेशोत्सवही येणार आहे. अशावेळी या व्यावसायिकांवर गदा आणणे म्हणजे त्यांना उपासमारीच्या खाईत लोटण्यासारखे आहे. प्रशासनाने कारवाईच्या अगोदर पर्यायी जागा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक होते.
प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष
लांजा शहरातील रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या लघु उद्योजकांवर प्रशासन कोणती भूमिका घेते आणि उद्धवसेनेच्या इशाऱ्यानंतर स्थानिक राजकीय वातावरणात काय बदल होतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

