(राजापूर /रत्नागिरी प्रतिनिधी)
विहिरीवर म्हशी धुण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान मारहाणीमध्ये झाल्याप्रकरणी राजापूर न्यायालयाने चार जणांना प्रत्येकी सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची तसेच एकत्रित १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. हाके यांनी हा निकाल दिला. आत्माराम लक्ष्मण शिंदे, शांताराम लक्ष्मण शिंदे, अनिल आत्माराम शिंदे आणि अजित आत्माराम शिंदे (सर्व रा. हरळ वारेवाडी, ता. राजापूर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
खटल्यातील माहितीनुसार, हरळ वारेवाडी येथील विहिरीवर आरोपी म्हशी धुत असताना तक्रारदार प्रतीक प्रभाकर शिंदे यांनी पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न उपस्थित करत त्यास आक्षेप घेतला होता. या कारणावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर आत्माराम आणि अनिल शिंदे यांनी प्रतीक शिंदे यांना बांबूने मारहाण करून डोक्यावर, हातावर व बोटांवर दुखापत केल्याचा आरोप होता. याच घटनेदरम्यान अजित शिंदे यांनी प्रतीक यांची बहीण हेमांगी हिला धक्काबुक्की व मारहाण करत शिवीगाळ केली, तर शांताराम शिंदे यांनी फिर्यादीचे वडील प्रभाकर शिंदे यांना बांबूने मारहाण केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र चव्हाण यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने विशेष सहाय्यक सरकारी वकील ओंकार गांगण यांनी नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदवली, तर अंतिम युक्तिवाद सहाय्यक सरकारी वकील भालचंद्र सुपेकर यांनी केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय प्रमाणपत्रे, फिर्यादीच्या रक्तगटाशी जुळणारे कपडे व मारहाणीसाठी वापरण्यात आलेल्या बांबूवरील रक्तनमुने यांचा रासायनिक विश्लेषण अहवाल न्यायालयाने महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला. उपलब्ध पुरावे विश्वासार्ह व निर्विवाद असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपींविरुद्धचा आरोप सिद्ध झाल्याचा निष्कर्ष काढला आणि चौघांनाही कारावासाची शिक्षा सुनावली.

