(रत्नागिरी / प्रतिनिधी)
नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती नोंदविण्याचा सोमवार (१३ ऑक्टोबर) हा शेवटचा दिवस असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी या मुदतीत वाढ देण्याची मागणी केली आहे. यादीतील त्रुटी आणि सदोष बाबींची सविस्तर कल्पना देत त्यांनी आज थेट रत्नागिरी नगर परिषद कार्यालयात जाऊन प्रशासक तथा मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेतली.
माने यांनी चर्चेदरम्यान मतदार यादीतील अनेक तांत्रिक चुका, नावांमधील विसंगती आणि अपूर्ण नोंदी याकडे लक्ष वेधले. या त्रुटींमुळे नागरिकांना आपले नाव तपासताना किंवा हरकत नोंदविताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे हरकतींसाठी असलेली मुदत वाढवून देणे अत्यावश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच या संदर्भात राज्य निवडणूक आयोगालाही लेखी स्वरूपात निवेदन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी माने यांचे म्हणणे ऐकून घेतले. लेखी स्वरूपात हरकत नोंदविल्यास त्यावर योग्य ती दखल घेतली जाईल आणि आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या भेटीप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मिलिंद कीर, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, विभाग प्रमुख साजिद पावसकर, उपशहरप्रमुख सलील ढापळे, नितीन तळेकर, सौ. राजश्री शिवलकर, बिपिन शिवलकर, तालुका प्रमुख शेखर घोसाळे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बाळ माने यांनी सांगितले की, “प्रारूप यादीतील त्रुटी दूर करून निवडणुकीची प्रक्रिया निष्पक्ष (impartial) आणि पारदर्शक (transparent) व्हावी, हा या मागणीचा मूळ हेतू आहे. आता राज्य निवडणूक आयोगाकडून हरकतींची मुदतवाढ दिली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

