(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरालगतच्या मिऱ्या रोडवरील भाटी मिऱ्या परिसरात शनिवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर झालेली भीषण धडक एका तरुणाच्या जीवावर बेतली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा आवाज इतका प्रचंड होता की, परिसरातील नागरिकांनी क्षणार्धात घटनास्थळी धाव घेतली.
प्राथमिक माहितीनुसार, एक दुचाकी रत्नागिरी शहराकडून मिऱ्याच्या दिशेने जात असताना, मिऱ्याकडून शहराकडे येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी भाटी मिऱ्या येथील वळणावर तिची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा आघात इतका तीव्र होता की दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवर असलेले तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथून रत्नागिरीत फिरण्यासाठी आले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या अपघातात संस्कार कांडर (वय २०, पन्हाळा, कोल्हापूर) याचा जागीच मृत्यू झाला. तर अथर्व संजय भोईर (वय २१, अंबरनाथ, ठाणे), दिग्विजय पाटील (वय २३, पन्हाळा, कोल्हापूर) आणि केशव कुशवाह (वय २२, रत्नागिरी) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना रुग्णवाहिकेतून तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी एकाच्या दातांसह जबड्याला गंभीर इजा झाली असून तो भाग शरीराबाहेर आल्याचे चित्र अत्यंत विदारक होते. अन्य एकाची प्रकृती गंभीर असून, तिसऱ्याला तुलनेने किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीस धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू असून जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याबाबत पोलीस अधिक तपास करत असून मिऱ्या रोडवरील वाढत्या अपघातांनी पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

