(रत्नागिरी)
भाविकांचे श्रद्धास्थान व हिंदू – मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हातीस येथील पीर बाबरशेख बाबांचा उरूस बुधवारी (दि. १२) साजरा करण्यात आला. उरुसानिमित्त सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. उरुसानिमित्त दर्गा व परिसर सुशोभित करण्यात आला आहे. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
उरुसानिमित्त रत्नागिरी बसस्थानकातून सकाळी ६:०० वाजल्यापासून जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. हरेचरी, चांदेराई, काजरघाटी, सोमेश्वर मार्गावरही जादा फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती.यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हातीस मार्गावर व दर्यात, यात्रास्थळी पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी मानकऱ्यांच्या हस्ते चुनालेपण करण्यात आले.
परिसरात आज महाप्रसाद
रात्री मानकरी नागवेकर यांच्या घरातून संदल, चादर मिरवणूक काढण्यात आली. यानिमित्ताने रातीबचाही कार्यक्रम आयोजित केला होता. रात्री उशिरा दर्यात भाविकांच्या शेकडो उपस्थितीत चादर अर्पण करण्यात आली. दर्गा परिसरात फुले, चादरी, नारळ, प्रसाद, खेळणी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे परिसर फुलून गेला होता. आज (गुरुवार) सायंकाळी दर्गा परिसरात नियाज (महाप्रसाद) होणार आहे.