( जाकादेवी / संतोष पवार )
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील रहिवाशी सुरेश यशवंत जोशी यांनी सन १९७२ पासून आजतागायत सुमारे ५४ वर्ष गणपती कारखान्यात विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या हस्तकौशल्यावर रेखीव आणि लक्षवेधी गणपती मूर्ती तयार करण्याची कला मोठ्या भक्तिभावाने जोपासली आहे. प्रत्येक वर्षी त्यांच्या कलाकौशल्यातून सुमारे ५५० पेक्षा जास्त गणेश मूर्ती साकारल्या जातात. भाविकांच्या मागणीबरोबरच या कलेची साधना मी मोठ्या श्रद्धेने जपली असल्याचे सुरेश जोशी आवर्जून सांगतात.
बहुतांश गणेश मुर्ती साच्याशिवाय तर काही मुर्ती स्वतः हस्तकलेच्या आधारावर ते साकारत आले आहेत. त्यामुळे त्यांचे हस्तकौशल्य संपूर्ण जाकादेवी खालगाव दशक्रोशीत त्यावेळी अल्पावधीतच विस्तारले गेले. त्यामुळे जाकादेवी दशक्रोशीतून गणपती मूर्ती तयार करण्याची मागणी वाढली आणि बघता बघता प्रारंभीच्या काळात २५ गणेश मूर्ती तयार करणारे जोशीकाका पूढे २५० मूर्ती तयार करण्यापर्यंत गेले. गेल्या काही वर्षांपासून सुरेश जोशी आपल्या मुलाच्या साथीने ५५० गणेश मूर्ती तयार करत आले करत आहेत. ही वाढती मागणी जोशी कुटुंबांच्या कलेचे यश आहे.
सुरेश जोशी यांचे मूळ गाव ओरी असून विद्यार्थी जीवनामध्ये शिक्षणासाठी ते कोतवडे येथे त्यांचे बालपण गेले, बालपणी कोतवडे परिसरात मूर्तीकरांचे त्याने निरीक्षण केले. कोतवडे येथील श्री. पांचाळ मूर्तीकार यांच्या कलेचा प्रभाव मूर्तीकार सुरेश जोशी यांच्यावर पडला. गणेश मूर्ती त्यांच्या मनात कोरल्या गेल्या आणि विद्यार्थी जीवनापासूनच त्यांनी मूर्ती तयार करण्याची कला अवगत केली.असंख्य भाविकांची श्रद्धा ते मूर्ती रूपाने मनोभावे जपत आहेत.
गणपती उत्सवाच्या अगोदर सुमारे चार महिने ते गणपती काढण्याचे कार्य अविरतपणे चालू ठेवले आहे. या कामात त्यांचा मुलगा सुनिल आणि नातू अर्णव हे त्यांना मदत करतात शिवाय त्यांच्या घरातील मंडळींचे सहकार्य उत्तम मिळते. या कामात परिसरातील होतकरू तसे ज्यांना आवड आहे असे चित्रकार, कलाकारांना सोबत घेऊन त्यांच्या कलेलाही त्यांनी वाव दिला आहे.
जाकादेवी दशक्रोशीतील प्रसिद्ध नावलौकिक असलेले सुरेश यशवंत जोशी यांना गणपती काढण्याचा अविरत छंद असून गणपती काढण्यासाठी लागणारी माती पनवेल येथून आयात करतात. गणपती तयार करताना फार मोठा भक्तीभाव आमच्या कुटुंबात निर्माण होतो आणि मनोमन समाधान वाटते, अशी भावना त्यांनी आमच्या प्रतिनिधींकडे बोलताना व्यक्त केली.आज या कारखान्यात एक फूट उंची पासून ते साडेसहा फूट उंचीपर्यंत मूर्ती ते घडवत आहेत. अशा प्रकारे सुरेश जोशी कुटुंब हे फार मोठे श्रद्धावान व मूर्तीकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत.

