( त्र्यंबकेश्वर )
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात सशुल्क दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, ‘ब्रेक दर्शन’ आणि देणगी दर्शन योजनेतून मंदिर ट्रस्टला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे २५०० रुपये प्रति व्यक्ती असलेल्या अतितातडीच्या दर्शन सेवेला भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, साप्ताहिक सुट्ट्यांच्या दिवशी मोठा प्रतिसाद मिळत आहे, रविवारी एका दिवसातच तब्बल २१ लाख रुपयांचे उत्पन्न देवस्थानला मिळाले आहे.
मात्र, या सशुल्क दर्शन व्यवस्थेमुळे मोफत दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांची गैरसोय होत असल्याचा आरोप होत आहे. पेड दर्शनासाठी वारंवार रांगा थांबवल्या जात असल्याने सामान्य भाविकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांमध्ये वादाचे प्रसंगही घडत असल्याचे दिसून येत आहे.
२०० रुपयांच्या देणगी दर्शनालाही वाढता प्रतिसाद
मंदिर प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन तिकीट दर्शनासाठी तीन स्वतंत्र खिडक्या सुरू केल्या होत्या. त्यानंतर २०० रुपये ‘मानसी देणगी दर्शन’ योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि बाह्य परिसरात पेड दर्शनासाठी मोठ्या रांगा लागत असल्याने अनेक भाविक त्याच पर्यायाकडे वळत असल्याचे चित्र आहे. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वाहनतळ आणि संत नगरी मार्गाने येणारे सुमारे ९० टक्के भाविक प्रथम पेड दर्शनाच्या रांगा पाहतात. त्यामुळे मोफत दर्शन रांग नेमकी कुठे आहे, याची माहिती नसल्याने अनेक जण थेट तिकीट काढण्यास प्रवृत्त होत असल्याचे सांगितले जात आहे.
तिकीट काळाबाजार रोखण्यासाठी सुरू केली योजना
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात दर्शन तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी देवस्थान ट्रस्टने ‘अतितातडीचे विराम दर्शन’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत भाविकांना २५०० रुपये प्रति व्यक्ती शुल्क भरून जलद दर्शनाची सुविधा दिली जाते. लांबून आलेले किंवा अत्यल्प वेळ असलेले भाविक या सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. परिणामी, सशुल्क दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या संख्येत जवळपास ४० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘५ मिनिटांच्या ब्रेक’ची विशेष व्यवस्था कशी?
सध्या मंदिरात मोफत धर्मदर्शन आणि २०० रुपयांचे देणगी दर्शन या दोन प्रमुख सेवा सुरू आहेत. या दोन्ही दर्शन रांगा सुरू असताना मधल्या काळात अवघा पाच मिनिटांचा विराम दिला जातो. या वेळेत ‘अतितातडीचे विराम दर्शन’ घेणाऱ्या भाविकांना थेट दर्शनासाठी प्रवेश दिला जातो.
देवस्थान प्रशासनाच्या मते, या व्यवस्थेमुळे तिकीटांचा काळाबाजार कमी झाला आहे. मात्र दुसरीकडे, सामान्य भाविकांना होणारा विलंब आणि वाढती गर्दी हा चर्चेचा विषय ठरत आहे.

