(देवळे /प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज पहाटे उघडकीस आली. दख्खन बसथांब्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून साखरपा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रामा बाळू माशाळ (वय ३०, रा. खिलारहट्टी, ता. बबलेश्वर, जि. विजापूर) हा सापुचेतळे येथून विजापूरकडे दुचाकीवरून निघाला होता. आंबा घाटातील दख्खन बसथांब्याजवळ आल्यानंतर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रामा माशाळ याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील रामा माशाळ याला उपचारासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या असून अपघात करून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेमागील परिस्थिती अत्यंत हृदयद्रावक आहे. मृत रामा माशाळ याचे नातेवाईक बाळू मल्लारी तांबे यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी विजापूरला जाण्याची तयारी सुरू होती. नातेवाईकांनी सर्वांनी मिळून मोठ्या वाहनाने जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रामा माशाळ याने तो सल्ला न मानता स्वतःच्या दुचाकीवरून रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास सापुचेतळे येथून विजापूरकडे एकटाच निघाला होता.
याबाबत बोलताना बाळू मल्लारी तांबे यांनी अत्यंत भावनिक शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. “माझे ऐकले असते तर आज माझा भाचा आज जिवंत असता,” असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास आंबा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत रामा माशाळ याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आजीच्या अंत्ययात्रेला जात असताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास देवरुख पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

