(संगमेश्वर / एजाज पटेल)
आंबेड खुर्द-तांबेवाडी मुख्य रस्त्यावर बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुख्य रस्त्यालगत एक बिबट्या निर्धास्तपणे बसलेला आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवी वस्तीच्या अगदी जवळ आणि वर्दळीच्या मार्गावर हिंस्त्र प्राण्याचे दर्शन झाल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
कळंबस्ते येथील रहिवासी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मजीद नेवरेकर हे आपल्या कुटुंबासह चारचाकी वाहनातून आंबेड खुर्द-तांबेवाडी मार्गाने प्रवास करत होते. यावेळी त्यांच्यासोबत आंबेड खुर्द येथील मुजम्मील कापडी हेही उपस्थित होते. रस्त्यावरील चढण ओलांडत असताना वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशात रस्त्याच्या अगदी कडेला बसलेला बिबट्या त्यांच्या नजरेस पडला.
विशेष म्हणजे हा बिबट्या केवळ रस्ता ओलांडत नव्हता, तर बराच वेळ रस्त्यालगत दबा धरून बसल्याचे दिसून आले. त्याच्या हालचाली आणि बसण्याच्या पद्धतीवरून तो भक्ष्याच्या शोधात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांबरोबरच परिसरातील पाळीव जनावरांनाही धोका निर्माण झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
अचानक समोर बिबट्या दिसल्याने वाहनातील सर्वजण काही काळ घाबरून गेले. मात्र, मजीद नेवरेकर आणि मुजम्मील कापडी यांनी प्रसंगावधान राखत वाहन सुरक्षित अंतरावर थांबवले. कोणतीही घाईगडबड किंवा बिबट्याला चिथावणी मिळेल अशी कृती न करता त्यांनी शांतपणे परिस्थितीचा सामना केला. दरम्यान, वाहनातील सदस्यांनी मोबाईलवर या घटनेचे चित्रीकरणही केले. काही वेळाने बिबट्या जंगलाच्या दिशेने निघून गेल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
या प्रसंगात मजीद नेवरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेले धैर्य व संयम कौतुकास्पद ठरले आहे. अशा परिस्थितीत अनेकदा घाबरून चुकीचे निर्णय घेतले जातात. मात्र, त्यांनी शांतता राखत योग्य निर्णय घेतल्याने संभाव्य अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, आंबेड खुर्द-तांबेवाडी परिसरात बिबट्याचा वावर वारंवार आढळत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभाग आणि संबंधित प्रशासनाने या भागात नियमित गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

