(रायगड)
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले आणि शिवसेना नेते विकास गोगावले यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया देत कोकणातील राजकीय समीकरणांवर भाष्य केले आहे.
मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केले की, महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून देण्यात आल्याने शिवसेनेने या जागेवरील दावा मागे घेतला. कोकणातील जागेबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट होती, मात्र युती टिकविण्याला प्राधान्य देत निर्णय स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री पदाच्या चर्चेबाबत बोलताना गोगावले म्हणाले की, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात यासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बोलावण्यात आले होते, मात्र वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणावर शुभेच्छुक भेटीस येणार असल्याने आपण अर्ज भरण्यासाठी गेलो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेना नेते विकास गोगावले यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. कोकणातील ही जागा शिवसेनेचीच होती आणि वरिष्ठांच्या आदेशामुळेच आपण थांबलो, अन्यथा जिल्हा तसेच कोकणातील राजकीय चित्र वेगळे दिसले असते, असा दावा त्यांनी केला.
“कोकणात शिवसेनेची ताकद सर्वाधिक आहे. त्यामुळे हा मतदारसंघ लढविण्याची पूर्ण तयारी सुरू होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या आदेशाचा मान राखत आम्ही माघार घेतली,” असे विकास गोगावले यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी भविष्यातील राजकीय घडामोडींवरही सूचक भाष्य केले. पक्ष नेतृत्वाचा निर्णय स्वीकारत पक्षहिताला प्राधान्य दिल्याचे सांगतानाच, ही शेवटची वेळ असल्याचेही त्यांनी नमूद केले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांनी दिलेला शब्द पाळणे आवश्यक असल्याचा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून बोलताना विकास गोगावले म्हणाले, “राजकारणात कोणाचाही काळ कायमस्वरूपी नसतो. प्रत्येकाचा वेळ ठरलेला असतो. आज दिलेला शब्द पाळला गेला नाही, तर भविष्यात आम्हालाही आमची राजकीय भूमिका नव्याने ठरवावी लागेल.” त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

