( देवळे / प्रकाश चाळके )
संगमेश्वर तालुक्यातील देवळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या आंबा बागांचे गवारेडयांकडून अतोनात नुकसान केले जात असून यावर वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मागणी आहे.
सध्या देवळे चाफवली गावातील आंब्याच्या बागातून गवारेड्यांचे कळपच्या कळप येत असून हातातोंडाशी आलेल्या आंबा पिकांचे भयानक नुकसान करत असून यावर कोणती उपाययोजना करता येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. हे गवारेड्यांचे कळप आंबा बागातून घुसतात आणि जिथपर्यंत मान पोहोचते तिथपर्यंतचा आंबा ओढुन खातात किंवा फांद्यांना घासून फांदी हलवतात व मोडतातही, त्याने आंबा खाली पडला की तो खातात बाकीचा आंबा तसाच सोडून जातात.
यामुळे आंबा बागातदारांचे फार मोठे नुकसान होत असून यावर पर्यायच मिळत नसल्याने व ते हाकलूनही जात नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. काजू बागायती मध्येही गवेरेडे असेच फार मोठे नुकसान करत असून छोटी-मोठी काजूची झाडे शिंगात अडकवून उपटून टाकतात त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे.
देवळे गावातील सलीम खतीब, नाझीम खतीब, चाफवली येथील लक्ष्मण चाळके, प्रकाश चाळके यांच्या आंब्याच्या बागांचे गवारेड्यांनी फार मोठे नुकसान केले आहे. हे गवे फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाही बागातून फिरू लागले आहेत. त्यामुळे यांचा बंदोबस्त कसा करावा या विवंचनेत या भागातील शेतकरी सापडले आहेत.
याबाबत वनविभागाकडे तक्रार केल्यास त्याला लागणाऱ्या कागदपत्र गोळा करण्यातच फार वेळ लागतो. कृषी विभाग, तलाठी कार्यालय, घोषणापत्र, सातबारा, आठ अ, भूमी अभिलेखचा नकाशा, अशा अनेक गोष्टींचा पाठपुरावा करताना व सह्या घेताना, पंचयाद्या घालताना शेतकरी हैराण होतो. त्यामुळे तक्रारही करायला शेतकरी पूढे येते नाहीत. माकडांचाही असाच त्रास होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यानी केलेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी वन विभागाच्या अधिकारी, गावचे पोलीस पाटील, सरपंच, यांच्या सहीचा पंचनामा हाच ग्राह्य धरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.