(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्ह्यात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत तब्बल ७३ गुन्हे दाखल होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने नोंदवले आहे. अशा प्रकरणांमध्ये पीडित बालकांना तातडीने न्याय मिळावा, साक्षीदारांची योग्य मदत उपलब्ध व्हावी आणि जलदगती न्यायालयात प्रकरणांची सुनावणी होऊन लवकरात लवकर निकाल लागावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे स्पष्ट निर्देश आयोगाने दिले. यामुळे समाजात सकारात्मक संदेश जाईल आणि अशा गुन्ह्यांना आळा बसेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ गेल्या तीन दिवसांपासून रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ध-न्यायिक सुनावणी तसेच विविध विभागांची सविस्तर आढावा बैठक पार पडली. आयोगाच्या सुनावणीत एकूण ९ प्रकरणे दाखल झाली होती. त्यापैकी ३ प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला असून, उर्वरित प्रकरणांचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करून अंतिम निर्णय दिला जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. ही प्रक्रिया रत्नागिरीपासून सुरू करण्यात आल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
जिल्ह्यात बालकांविषयक गुन्ह्यांचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असले तरीही संबंधित विभागांनी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याची गरज आयोगाने अधोरेखित केली. बालकांचे हक्क, सुरक्षा, शिक्षण आणि आरोग्य यांचे संरक्षण ही केवळ शासनाचीच नाही तर समाजाचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
बालविवाह, बालमजुरी, शालेय पोषण आहार, कुपोषण, शाळाबाह्य मुले आदी विषयांवर आयोगाने आढावा घेतला. मात्र, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांदरम्यान अधिकृत आकडेवारी आणि प्रत्यक्ष स्थितीतील तफावत समोर आल्याने आयोगाने यावर गंभीर दखल घेतली. संबंधित विभागांनी आकडेवारी आणि समन्वयातील अंतर तातडीने दूर करावे, असे निर्देश देण्यात आले. पुढील आढावा बैठकीपर्यंत ही तफावत दूर होऊन बालस्नेही प्रशासनाची प्रतिमा अधिक सक्षमपणे उभी राहावी, अशी अपेक्षाही आयोगाने व्यक्त केली. या दौऱ्यात अध्यक्ष संजय पुराणिक यांच्यासह सदस्य अतुल देसाई, गीतांजली बुटी, शुभांगी तांबट, प्रवीण भुजाडे, मिलन देवेंद्र जंगम-गुरव आणि सचिव पंकज देवरे उपस्थित होते.

