(रत्नागिरी / प्रतिनिधी)
देवरुख-रत्नागिरी मार्गावरील निवे बुद्रुक येथे रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका नमन कलाकाराचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरवर वॅगनआर कार आदळल्याने हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून नमन कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायले येथे नमनाचा कार्यक्रम आटोपून कलाकारांचा चमू निवळीच्या दिशेने परतत होता. रविवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास निवे बुद्रुक येथे त्यांच्या वॅगनआर कारने (एमएच ०२ जेपी ९४९३) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला (एमएच ०८ जी १५५९) पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून मदतकार्य सुरू केले.
या अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. सचिन विभुते, राजू ताम्हणकर, उमेश ताम्हणकर, संतोष सांडिम तसेच अन्य नागरिकांनी धाव घेत अपघातग्रस्तांना सुरक्षित बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच ‘भगवान महादेव सांबरे रुग्णवाहिका सेवा’चे चालक मनोज पांचाळ यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून सर्व जखमींना उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या भीषण अपघातात एका नमन कलाकाराचा मृत्यू झाला असून त्याची ओळख उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकली नव्हती. इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण काय, डंपर रस्त्यालगत कोणत्या परिस्थितीत उभा होता, तसेच अन्य तांत्रिक बाबींचा पोलीसांकडून तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे देवरुख परिसरात शोककळा पसरली असून नमन कलावंतांच्या वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

