(कळझोंडी / किशोर पवार)
पुणे जिल्ह्यातील आढे येथील मैदानावर घेण्यात आलेल्या श्री भैरवनाथ चषक २०२५ च्या फूल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत अतिशय उत्तमप्रकारे खेळी करत मालिकावीरचा बहुमानाचा किताब नायरा ११ संघाचा हुकमी एक्का सुमित पवार याने पटकाविल्याने त्याला हिरो होंडा (H.F.Dilux ) दुचाकी गाडी व भव्य चषक देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गावातील सुपूत्र सुमित पवार याने लहानपणापासून क्रिकेट क्षेत्रात आवड निर्माण केली. ग्रामिण भागातील छोट्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेत त्याने अतिशय कठोर परिश्रम घेऊन शाळा कॉलेज मध्ये असताना ही चांगला ठसा उमटवला होता. अतिशय आक्रमक फलंदाजीने व भेदक गोलंदाजीने भल्या भल्या क्रिकेट संघाना गारद केले आहे. गतवर्षीही त्याने मावळचा मावळा म्हणून “आमदार चषक” जिंकला होता.
गेली अनेक वर्षे तो पुणे तळेगाव मावळ तालुक्यातील सुप्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये क्रिकेट क्षेत्रात आपले नाव कोरले आहे.
सन २०२५ चा श्री भैरवनाथ चषक मालिकावीर बहुमान किताब पटकाविणाऱ्या सुमित पवार याला प्रथम विजेता म्हणून घोषित करण्यात आले. त्याचवेळी पुणे जिल्ह्यातील मावळ व आढे परीसरातील व रत्नागिरी जिल्ह्यातील व तालुक्यातील कळझोंडी गावातील तमाम क्रिकेटप्रेमी नागरिकांनी नायरा ११ संघाचा हुकमी एक्का व मालिकावीर सुमित पवार यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. सुमित पवार यांचे रत्नागिरी, पुणे, मुंबई, सावंतवाडी, कोल्हापूर विभागातून उत्स्फूर्त अभिनंदन केले जात आहे.

