(रत्नागिरी / प्रतिनिधी)
लग्नाचे आश्वासन देत एका महिलेचा विश्वास संपादन करून तिची फसवणूक तसेच लैंगिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार रत्नागिरी तालुक्यात उघडकीस आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणातील संशयिताला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हातखंबा गुरववाडी येथील अमित मधुसूदन देसाई याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१६ साली संशयिताची ओळख पीडित महिलेच्या पतीमार्फत झाली होती. त्यानंतर त्याने महिलेशी जवळीक वाढवत तिचा विश्वास संपादन केला. ‘मी माझ्या पत्नीपासून वेगळा होणार असून, तू देखील तुझ्या पतीपासून विभक्त हो. आपण एकत्र राहू आणि मी तुझ्याशी विवाह करेन,’ असे आश्वासन देत संशयिताने महिलेसमोर भविष्यातील संसाराचे चित्र रंगवले. या आश्वासनांवर विश्वास ठेवून महिलेने त्याच्याशी संबंध कायम ठेवले. मात्र, हे सर्व आश्वासन केवळ फसवणुकीसाठी दिले असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, २०२२ मध्ये खेडशी चौसोपीवाडी, २०२४ मध्ये भोके आणि २०२६ मध्ये हातखंबा तारवेवाडी येथे संशयिताने महिलेची फसवणूक करत तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. लग्नाचे आमिष दाखवून विश्वासात घेतल्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. आपली दिशाभूल होत असल्याची जाणीव झाल्यानंतर संबंधित महिलेने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच ग्रामीण पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

