(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तहसील कार्यालयाच्या आवारातील दुचाकी पार्किंगमधून भरदिवसा दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. २५ मे रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती प्रकाश कदम (वय ५७, रा. दत्त मंदिरसमोर, तेली आळी, रत्नागिरी) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या मालकीची एमएच ०८ एएच ३५९२ क्रमांकाची दुचाकी तहसील कार्यालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये उभी करण्यात आली होती. मात्र, काही वेळानंतर परत आल्यानंतर दुचाकी जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्याने संधी साधत दुचाकी लंपास केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत १५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. भरदिवसा शासकीय कार्यालयाच्या आवारातूनच दुचाकी चोरीला गेल्याने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

